चाळीसगाव : येथील बाप्पा पॉईंटजवळ असलेल्या विवेकानंद सोसायटीतील बंद घराचे मागील कोयंडा तोडून घरातील दहा हजार रुपयाची रोकड व 59 हजार 400 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी दि.11 डिसेंबर रोजी भरदिवसा चोरून नेले आहे. दुपारच्या सुमारास बाहेर गेलेले कुटुंब घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
येथील बाप्पा पॉईंट जवळील विवेकानंद सोसायटीतील रहिवाशी अपंग संस्थेच्या अध्यक्षा व फॅशन डिझायनिंग क्लासेसच्या संचालिका कु.मिनाक्षी राजाराम निकम (वय 44) यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी दि.11 रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान घरातील कपाटात ठेवलेले 27 हजार रुपये 15 ग्रॅम सेान्याचे लॉकेट, 23 हजार 400 रुपये किमतीची सोन्याची पोत, 9 हजार किमतीचे कानातील 4 कर्णफुले व 10 हजार रुपयाची रोकड चोरून नेली आहे.मिनाक्षी निकम या परिवारासह गावात खरजाई नाक्याजवळ त्यांच्या मामाकडे जेवणाच्या कार्यक्रमासाठी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गेले होते. कार्यक्रम आटपून दुपारी 3 वाजेला घरी परतल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला. या संदर्भात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात भाग-5 गुरनं 169/2016 भादंवि कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक अरूण पाटील हे करीत आहेत.