चाळीसगाव । येथील बसस्थानकाजवळ असलेल्या सुवर्णा स्मृती उद्यानात अनेक समस्या असून व्यायामासाठी असलेल्या साहीत्याची तुटफुट झाली असून सकाळी व संध्याकाळी जॉगींग व व्यायामासाठी आलेल्या नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शनिवार 21 जानेवारी 2017 रोजी सकाळी चाळीसगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण व त्यांचे पती नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रमेश (आबा) चव्हाण हे उद्यानात गेले असता नागरिकांनी त्यांच्या समोर समस्यांच्या पाढाच वाचला. यावेळी त्यांनी उद्यानाचे लवकरच नव्याने सुशोभिकरण करण्याचे आश्वासन दिले आहे.समस्यांचा पाढा
उद्यानात पसरले धुळ व घाणीचे साम्राज्य
वाढते प्रदुषण व दैनंदिन जीवनात असलेली दगदग यामुळे आरोग्याकडे आपले लक्ष जात नाही. म्हणून वेळेची बचत आणि कमी वेळात गावातच शरीराचा व्यायाम व्हावा या दृष्टीकोनातून चाळीसगांव शहरातील बसस्थानकासमोर सुवर्णास्मृती उद्यानाची निर्मीती करण्यात आली आहे. या उद्यानात व्यायामाचे साहीत्य, जिमचे साहीत्य ठेवण्यात आले असून नागरिकांना पायी फिरण्यासाठी मोठा जॉगींग ट्रॅक करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या वतीने काही दिवस लक्ष ठेवण्यात आले. मात्र मागील वर्षभरापासून उद्यानातील जॉगींग व व्यायामाच्या साहीत्याची तुटफुट झाली आहे. त्याचप्रमाणे तयार करण्यात आलेले जॉगींग ट्रॅक खराब झाला असून उद्यानात धुळ व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मागील काळात काही वृक्ष उलमडून पडल्याने ते देखील उचललेले नाहीत. स्वच्छतेच्या अभावामुळे उद्यानात डास, मच्छरांचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे.
उद्यानात यांची होती उपस्थिती
नगरपालिकेच्या उपाध्यक्षा आशाबाई रमेश चव्हाण व त्यांचे पती न.पा.चे माजी उपाध्यक्ष रमेश (आबा) चव्हाण हे या उद्यानात फिरण्यासाठी गेले असता, नागरिकांनी त्यांच्या पुढे समस्यांचा पाढाच वाचला त्यांनी उद्यानाची पुर्ण पाहणी करून लवकरच या उद्यानाचे नव्याने सुशोभिकरण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी नागरिकांनी त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांचे समवेत प्रा. चंद्रकांत ठोंबरे, डॉ. राजेंद्र तलरेजा सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, जितेंद्र नेवे, डॉ. निलेश जाधव, डॉ. आर.एस.पाटील, महेंद्र तलरेजा, डॉ. शिरीष पवार, डॉ. अमृत राणा, डॉ. भोकरे, डॉ. सुजित वाघ, अॅड. पवार, आदी नागरिक उपस्थित होते.