चाळीसगावात एकावर दोघांकडून तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला

0

चाळीसगाव। शहरातील आठवडे बाजार झोपडपट्टीत राहणार्‍या 34 वर्षीय तरुणावर दोघा तरुणांनी तीक्ष्ण हत्याराने कपाळावर व डोक्याच्या मागील बाजूस हल्ला करून गंभीर जखमी केले असून सदर घटना 12 जून 2017 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास शहरातील गणेश रोड वरील शेवरे गॅरेज समोर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून त्यांचे विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, सपोनि राजेंद्र रसेडे, पोउनि विजयकुमार बोत्रे व पोलीस कर्मचारी यांनी रात्रभर शहरात व टाकळी प्रचा आणि खडकी बु येथे जाऊन सापळा रचून दोघा आरोपीना ताब्यात घेतले आहे.

एकाने लाईट मारून हटकले असता दोन्ही पसार
चाळीसगाव शहरातील गणेश रोडवर शेवरे यांच्या गॅरेज समोर शहरातील आठवडे बाजार झोपडपट्टीतील 34 वर्षीय तरुण ज्ञानेश्वर रायबा भोई यांना दि 12 जून 2017 रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास आरोपी पाशा उर्फ अमोल साहेबराव वाघ व अमोल राजेंद्र तांबे या दोघांनी त्यांच्या कपाळावर व डोक्याच्या मागील भागावर काहीतरी तीक्ष्ण हत्यार मारून गंभीर जखमी केले. सदर प्रकार होत असतांना गणेश कॉम्प्लेक्स येथे वाचमेन म्हणून ड्युटीवर असलेल्या राजेंद्र बुधा पाटील (50, रा. ओझर ता. चाळीसगाव) याना दिसल्यानंतर त्यांनी दुरून त्यांचेवर लाईट मारून हटकले असता ते दोघे तेथून पसार झाले त्यांनी हि माहिती पोलिसांना दिल्यावरून पोलिसांनी घटना स्थळावर येऊन जखमीला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले. जखमीच्या खिशात असलेल्या कागद पत्रांच्या आधारे ओळख पटल्यावर घरच्या लोकांना बोलावून घेतले त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी धुळे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

शहर पोलिसात गुन्हा
पोलिसांनी जळगाव येथील श्वान पथक व अंगुली मुद्रा पथक याना पाचारण करून घटना स्थळाची माहिती त्यांनी घेतली आहे. या प्रकरणी राजेंद्र बुधा पाटील (गणेश कॉम्प्लेक्स वाचमेन) यांच्या फिर्यादीवरून पाशा उर्फ अमोल साहेबराव वाघ (18, रा. शिवशक्ती नगर मोठी विहीर टाकळी प्रचा ता. चाळीसगाव) व अमोल राजेंद्र तांबे (20, रा.खडकी बुद्रुक ता. चाळीसगाव) यांचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राण घातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र रसेडे करीत आहेत.