चाळीसगावात एसबीआय व एचडीएफसी बँकासमोर रहदारीला अडथळा

0

चाळीसगाव (सूर्यकांत कदम) । शहरातील काही बँकासमोर वाहनतळ नसल्याने समोर लावलेल्या वाहनांमुळे रहदारीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असून मुख्यत: हा प्रकार भडगांव रोडवरील एसबीआय व स्टेशन रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर होत असल्याने अनेकदा वाहनधारकांमध्ये बाचाबाची होऊन छोटे अपघात देखील झाले आहेत. बँक प्रशासनाने याची दखल घेऊन वाहतूकीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे. बँक ही आजच्या काळात खुप गरजेची असून त्याठिकाणी व्यवहार करणे हे देखील महत्वाचे आहे. मात्र त्या बँकांसमोर बँक प्रशासनाने वाहन तळाची व्यवस्था करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. आपल्या बँकेमुळे रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून बँक प्रशासनाने याची दखल घेऊन रहदारीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी वाहन धारकांमधून होत आहे.

एसबीआय समोर पाकिंग नसल्याने रोडवरच गर्दी
शहरात मध्यवर्ती ठिकाणी व मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेल्या बँकांच्या समोर वाहने उभी करण्यासाठी वाहनतळे नसल्याने बँकेत येणारे ग्राहक त्यांची वाहने हमरस्त्यावर अथवा रस्त्याच्या कडेला लावत असल्याने त्या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होतांना दिसत आहे. परिणामी वाहनधारकांमध्ये शब्दीक चकमक होऊन किरकोळ हाणामारी मध्ये रूपांतर देखील होते. शहरातील भडगांव रोडवरील स्टेट बँकेत सर्वात जास्त खातेदार असल्याने व प्रामुख्याने नोटबंदीचा काळ असल्याने त्याठिकाणी मोठमोठ्या रांगा लागत होत्या व आज देखील ग्राहकांच्या रांगा दिसून येत आहे. त्यांची वाहने लावण्यासाठी बँकेच्या समोर वाहनतळ नसल्याने व वाहने लावण्यासाठी जागा अपुर्ण पडत असल्याने ग्राहक त्यांची वाहने रस्त्यावर अथवा रस्त्याच्या कडेला लावत असल्याने भडगांव रोडवरील मुख्य रहदारी करणारे अवजड वाहन चालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतांना दिसत आहे. परिणामी मोठ्यावाहन चालकांना त्यांची वाहने थांबवून रस्त्याच्या कडेला अथवा रस्त्यावर असलेली वाहने स्वत: बाजूला करावी लागत आहेत.

एचडीएफसी बँकेसमोरही गर्दी
तसाच प्रकार स्टेशन रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर होत असल्याचे दिसून येत आहे. स्टेशनरोड हा शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्यावर चाळीसगांव – नांदगांव रस्त्याची मुख्य वाहतूक त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन पासून गावात जाण्याचा मार्ग, महाविद्यालय, दवाखाने व प्रमुख दुकाने असल्याने वाहनांची मोठया प्रमाणावर वर्दळ असते. त्याच रस्त्याच्या कडेला ही बँक असल्याने बँकेच्या ग्राहकांना वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने वाहन चालक रस्त्याच्या कडेला अथवा रस्त्यावर वाहने लावत असल्याने वाहतूकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. वाहन चालकांमध्ये बाचाबाची होऊन किरकोळ मारामाछया होऊन छोटे अपघात देखील झाले आहेत.