चाळीसगावात चाकूच्या धाकावर गॅस एजन्सीत लूट : आरोपी अखेर जाळ्यात

चाळीसगाव : शहरातील मालेगाव रोडवरील एच.पी.गॅस एजन्सीतून चाकूच्या धाकावर साडेचार लाखांचा ऐवज लांबवून पळ काढलेल्या आरोपीच्या चाळीसगाव शहर पोलिसांच्या मुसक्या आवळल्या आहेत. भावेश मनोज माखीजा (मूळ रा.उल्हासनगर 5, मुंबई, ह.मु. सिंधी कॉलनी, चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

भरदिवसा केली होती लूट
चाळीसगावातील अशोक किसनचंद छाबडीया (58) हे मालेगाव रोडवरील एच.पी.गॅस एजन्सीत कामाला आहेत. या एजन्सीत दिवसभरात झालेल्या गॅस विक्रीचे पैसे सायंकाळी डिलीव्हरी बॉयकडून घेऊन दुसर्‍या दिवशी बंकेत भरणा करण्याचे काम छाबडीया करतात. सोमवार, 25 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास छाबडीया हे नेहमीप्रमाणे डिलीव्हरी बॉयकडून पैसे घेऊन मोजत असताना दुकानाचे शटर वर करून भावेश मनोज माखीजा (22, रा.उल्हासनगर) हा चाकू घेऊन मध्ये आला. छाबडीया यांना किरकोळ दुखापत करून पैसे दे अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच तीन लाख 65 हजारांची रोकड व 75 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र.एम.एच. 19 डीएक्स 2912) घेवून संशयीताने पळ काढला होता. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयीत हा गोवा गेल्याचे व 28 एप्रिल रोजी गोवा येथून विमानाने मुंबई येथे परत येणार असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस व पथकाला मिळाल्याने सापळा रचण्यात आला. सहारा विमानतळ, मुंबई येथे संशयीत आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

चोरीच्या पैशातून विदेशी मद्याची खरेदी
आरोपी भावेश माखीजाने लूट केलेल्या पैशातून गोव्यात नवीन कपडे खरेदी केले तसेच गोवा येथून महागडी विदेशी दारू व अन्य साहित्य खरेदी केले होते. ते सर्व साहित्य तसेच बळजबरीने लांबवलेली दुचाकी मिळून तीन लाख 13 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सहा.पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, नाईक भूषण पाटील, विजय पाटील आदींच्या पथकाने आरोपीला मुंबईतून अटक केली. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहा.पोलिस निरीक्षक विशाल टकले व राकेश पाटील करीत आहेत.