चाळीसगाव : दिवाळी निमित्ताने कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी आयतीच चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली. बंद घरातील लाकडी कपाटातून सोन्या चांदीसह रोकड मिळून तीन लाख 64 हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांना डल्ला मारला. ही घटना शहरातील छायादीग्राम भागात घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोर्या वाढल्याने पसरली भीती
चाळीसगाव शहरातील छायादीग्राम भागात राहणारे अविनाश फकिरराव चव्हाण (40) हे दिवाळी निमित्ताने शनिवार, 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता घराला कुलूप लावून आपल्या परीवारासह नातेवाईकांकडे गेले असता चोरट्यांनी संधी साधली. रविवारी सायंकाळी 5 वाजता ते आपल्या घरी परतल्यावर स्वयंपाक गृहाच्या मागील लोखंडी दरवाजाचे आतील कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यावर अविनाश चव्हाण यांनी वरच्या मजल्यावरील लाकडी कपाटाची पाहणी केली असता ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड मिळून एकूण तीन लाख 64 हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. अविनाश फकिरराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.