चाळीसगावात दरोडेखोरांच्या टोळीला अटक

0

अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या कारवाईला यश ; दरोड्याचे साहित्य जप्त

चाळीसगाव- चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावरील घाटाच्या सुरुवातीला वाहन धारकांना चाकूच्या धाकावर धमकावून लुटण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याची तक्रार चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्याकडे होती. त्या पार्श्वभूमीवर या भागात गस्त वाढवण्यात आली होती तर शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारासदेखील लूट होत असल्याची गुप्त माहिती बच्छाव यांना मिळाल्यानंतर त्यांनी गस्तीचे पथक पाठवल्यानंतर दहा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींच्या ताब्यातून तीन चाकू, दहा मोबाईल, फायटरसह 22 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. आरोपींविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपी आपली ओळख पटू नये यासाठी चेहर्‍याला मास्क लावत होते तर हे मास्कही जप्त करण्यात आले.

या आरोपींना अटक
भागवत बाळू पाटील (20), अश्विन शांताराम चव्हाण (19), विष्णू रामलाल लोणारे (20), अंकुश रामचंद्र गांगुर्डे (18), हिरामण राजू सोनवणे (22), समाधान रामदास म्हस्के (19), गोकुळ युवराज सोनवणे (20), विष्णू देवाजी सोनवणे (19), गौतम रणछोड पगारे (21), पुष्कर कैलास चौधरी (19) या आरोपींना अटक करण्यात आली.

वकिलीचे शिक्षण घेणारा म्होरक्या
दरोडेखोरांमध्ये वकिलीचे शिक्षण घेणारा भागवत पाटील या टोळीचा म्होरक्या असून अन्य आरोपी बारावीचे शिक्षण घेतात तर काही चालक तसेच वीट भट्टीवर हातमजूर म्हणून कामाला असल्याचे अपर पोलीस अधीक्षक बच्छाव म्हणाले.

या पथकाने केली कारवाई
चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवरील शशीकांत महाजन, बिभीषण सांगळे, गणपत महिरे व चालक नितेश पाटील यांनी सुरुवातीला दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या व नंतर रात्री दोन ते पहाटे सहा दरम्यान एपीआय बोरसे, उपनिरीक्षक वाल्हे, उपनिरीक्षक मानकर व चाळीसगाव ग्रामीणच्या पोलिसांनी आरोपींच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या.