चाळीसगाव- नगरपरिषदेमार्फत धुळे रोडवरील डेराबर्डी परिसरात जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या जलशुद्धीकरण केंद्राच्या किरकोळ दुरुस्ती व स्वच्छतेसाठी 3 व 4 एप्रिल (बुधवार, गुरुवार)ला पाणीपुरवठा बंद राहणार आहे असे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवस जपून पाण्याचा वापर करावा असे आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी जनशक्तिशी बोलतांना केले आहे.
पालिकेने शहरात ध्वनिक्षेपकावर शहरवासीयांना याबाबत कल्पना दिली आहे. उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची टंचाई व तीव्रता वाढली आहे. या दोन दिवसांत पाणी पुरवठा बंद असल्याने पिलखोड रस्त्यावरील पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील किरकोळ दुरुस्ती देखील पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान नगराध्यक्ष, सभापती, मुख्याधिकारी यांच्या देखरेखीत ६८ कोटींच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत होणारे काम देखील प्रगती पथावर आहे. येत्या दोन दिवसांत होणाऱ्या दुरुस्तीच्या अनुषंगाने वेळेत देखभाल दुरुस्ती व्हावी यासाठी कंबर कसली आहे.