चाळीसगावात धूम स्टाईल पोत लांबवली

चाळीसगाव : जिल्ह्यात धूम स्टाईल चैन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. शहरातील दयानंद पुलावरून जात असताना दुचाकीवरून जात असलेल्या विवाहितेच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरट्यांनी धूम स्टाईल लांबवली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
शहरातील मोरया नगरातील रहिवासी विश्वास धर्मराज चौधरी हे मेहुणबारे येथील आश्रमशाळेत शिक्षक आहेत. चौधरी यांच्या पत्नी कल्याणी विश्वास चौधरी (30) या रविवारी सायंकाळी 7.50 वाजताच्या सुमारास शहरातील दयानंद पुलावरून जात असताना समोरून दोन इसम दुचाकीवरून जवळ आले. त्यातील मागे बसलेला व राखाडी रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने कल्याणी चौधरी यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीचे मिनिगंठन लांबवले. विवाहितेने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु भामट्यांनी धूम ठोकली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात कल्याणी विश्वास चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.