चाळीसगाव। दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादाचे कारणावरुन शुक्रवारी 26 रोजी शहरातील रेल्वे स्टेशन परिसर व करगाव रोड वरील उन्नती मंडळाजवळ दोन गटात हाणामारी झाली. यात 6 जण जखमी झाले होते. त्यातील एक गंभीर जखमी झाल्याने त्यांना धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
शनिवारी 27 रोजी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. मुन्ना शाह असे मयताचे नाव आहे. मयताच्या नातेवाईकांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. संतप्त जमावाने रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या पोलीस चौकीवर दगड फेक केल्याने रेल्वे स्टेशन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हाणामारीत कोयता व चॉपर चा वापर झाल्याने रियाज शाह कदर शाह, सलीम शाह उर्फ रज्जाक गुलाब शाह, मुन्ना शाह गुलाब शाह व हैदर अली सय्यद अली हे जखमी झाले होते. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड एक्सनच्या तुकडी ला पाचारण करण्यात आले. चाळीसगाव पोलिस स्टेशनला पोलीस उपअधीक्षक केशव पांतोड यांच्यासह घटना स्थळी पोलीसांचा फौजफाटा दाखल झाला. शोकाकुल वातावरणात मुन्ना शहा यांच्यावर पिर मुसा कादरी बाबा पीर जवळ असलेल्या स्मशानभुमीत दफन विधी करण्यात आला.यावेळी अनेकांची उपस्थिती होती.