शिबीरास बालरूग्णांची तपासणी व मार्गदर्शन
चाळीसगाव – जागतिक आरोग्य दिन व मराठी नववर्षाचे औचित्य साधून रोटरी संगम व वेदांत बालरूग्णालयातर्फे तालुक्यातील गरजू व गरीब कुटुंबातील मतिमंद, गतिमंद, अडखळत बोलणे तसेच जन्मतः अनेक समस्या असलेल्या बालकांसाठी चाळीसगाव येथे निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराकरीता औरंगाबाद येथील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. संदिप सराफ, क्लिनिकल सायकोलोजिस्ट डॉ. संदिप सिसोदिया,ओडियोलोजिस्ट व स्पीच थेरपिस्ट डॉ. प्रशांत दलाल, फिजियोथेरपिस्ट डॉ. निदा खान उपस्थित होते.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत रोटरी संगमचे अध्यक्ष सुधीर पाटील व वेदांत रूग्णालयाचे संचालक सुधीर व प्रकल्प प्रमुख डॉ. प्रशांत शिनकर यांनी केले. डॉ. भाग्यश्री शिनकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की शिबिरात सहभागी झालेल्या मुलांना सातत्याने उपचार घेतल्यानंतर फायदा झाला असून त्यांच्या डोळ्यात आनंद पाहून आम्हाला प्रेरणा मिळते. मागील वर्षी एकूण १४० रुग्णाची तपासणी व उपचार केले. यावेळी चाळीसगावचे बालरोगतज्ज्ञ डॉ. गिरीश मुंदडा यांनी मनोगत व्यक्त करताना पालकांनी आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. शशिकांत राणा, रोटरी मिल्कसिटीचे अध्यक्ष राजेंद्र छाजेड व सचिव प्रकाश कुलकर्णी, इनरव्हिल संगमच्या श्रद्धा ठाकूर, रोटरी संगमचे महेश येवले, दिलीप येवले, प्रशांत येवले व अशोक शिनकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव प्रशांत कोतकर यांनी केले तर आभार मनोज शितोळे यांनी मानले.