14 रोजी निवडणूक जाहीर झाल्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत अनेकांच्या काळजाचे ठोके वाढले होते. कारण तालुक्यातील जनतेने दोन्ही पक्षांना म्हणजेच राष्ट्रवादी व भाजपाला समसमान अशा 7-7 जागा दिल्याने दोघांनीही या पदांवर दावा दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला नव्हता जे होईल ते ईश्वराच्या चिठीने होईल असे असतांना 14 रोजी मात्र सभापती व उपसभापतीपदी भाजपच्या स्मितल बोरसे व संजय पाटील यांची वर्णी विना ईश्वर चिठी काढता लागल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला या निकालात राष्ट्रवादी मॅनेज तर झाली नाही ना असा सूर सगळीकडे उमटत होता. दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास अचानकपणे पंचायत समितीच्या बाहेर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला. त्यामुळे सभापती व उपसभापती पदी भाजपाची वर्णी लागली हे सिद्ध झाले. पण हि वर्णी ईश्वर चिठीने न होता भाजपच्या बहुमताने लागली व राष्ट्रवादीच्या महिला सदस्या सुनीता पाटील यांनी सभापती व उपसभापतीच्या निवडीवेळी हात वर करून मतदान न केल्याने भाजपाला 7 व राष्ट्रवादीला 6 असे बहुमत झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला यामुळे राष्ट्रवादी मॅनेज झाली किंवा सभापती पदाऐवजी उपसभापती पदाचा अर्ज सुनीता पाटील यांचा अर्ज भरला गेला म्हणून त्या नाराज होऊन त्यांनी मतदानासाठी हात उंचावला नाही असा काहीसा अंदाज वर्तवला जात होता.
अर्ज भरतांना चूक झाली अथवा जाणून बुजून केली
सभापती व उपसभापती पदाचा अर्ज भरतांना भाजपच्या वतीने प्रत्येकी एक अर्ज भरला गेला तर राष्ट्रवादीच्या वतीने सौ सुनीता पाटील यांचा सभापती व उपसभापती या दोन्ही जागेसाठी प्रत्येकी एक अर्ज तर लता दौंड यांचा देखील सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला होता मात्र या अर्जाच्या प्रतींज्ञापत्रात सभापती पदासाठी सौ सुनीता पाटील यांच्या अर्जात नावाचं टाकले गेले नाही तर उपसभापती पदाच्या प्रतिज्ञापत्रात नाव टाकले गेले. त्या उलट लता दौंड यांच्या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात सभापती पदाच्या अर्जात नाव टाकले गेले व उपसभापती पदाच्या अर्जात नाव नव्हते त्यामुळे निवडीवेळी पदांचा बदल होऊन नाराज झालेल्या सौ सुनीता पाटील यांनी मतदानासाठी हात उंचावला नसावा असा अंदाज असला तरी यामागे नाराजी आहे कि वेगळेच काही असे तर्क काढले जात आहे. नगरपालिका स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीप्रक्रीये दरम्यान देखील असाच प्रकार शहर विकास आघाडीकडून (राष्ट्रवादी पुरस्कृत) झाला होता. त्यावेळी स्वीकृत नगरसेवक पदासाठी 2 अर्ज दाखल केले होते. मात्र त्या पैकी एक सुरेश चौधरी यांचा अर्ज असाच पद्धतीने बाद झाला होता. तीच पुनरावृत्ती पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणूक वेळी झाल्याने राजकीय गोटात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
भाजप व आमदारांचा लक फॅक्टर
चाळीसगाव तालुक्याचे आमदार उन्मेष दादा पाटील हे भाजपासाठी कमालीचे लकी ठरले असून ते आमदार झाल्यापासून तालुक्यात भाजपाला सुगीचे दिवस आले आहेत मागील काळात डोकावून पाहिल्यास सन 2009 ते 2014 दरम्यान आमदारकी वगळता सलग 20 वर्ष भाजपाकडे आमदारकीची सत्ता होती असे असतांना भाजपाला फारसे से यश प्राप्त करता आले नाही. मात्र सन 2014 वर्ष हे भाजपासाठी लकी वर्ष ठरले असून आमदार म्हणून उन्मेष दादा पाटील हे देखील भाजपाला लकी ठरले आहेत त्यांच्या माध्यमातून भाजपाला आश्चर्यचकित करणारे यश मिळत असून जिल्हा बँकेची निवडणूक वगळता सर्वच निवडणुकीत भाजपचा झेंडा तालुक्यावर फडकतांना दिसत आहे. त्यांचे नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी नगर पालिका ताब्यात घेण्यात भाजपाला यश आले आहे. तर चाळीसगाव पंचायत समिती हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता. पण तेथे देखील एखादा चमत्कार घडावा अशा पद्धतीने हि पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आली आहे त्यामुळे लक फॅक्टर हे आमदार उन्मेष दादांच्या रूपाने भाजप च्या पारड्यात आले आहे.
राष्ट्रवादी कडेही जनतेचा कौल?
आमदारकीच्या निवडणुकीत उन्मेश पाटील यांच्याकडून मात्तबर असे असलेले राजीव देशमुख यांना पराभव स्वीकारावा लागल्याने राष्ट्रवादीच्या गोटात काही काळ चिंतेचे वातावरण होते. त्यानंतर लागलीच कृउबा समितीची निवडणूक झाल्या नंतर सेनेच्या मदतीने भाजपने याठिकाणी सत्ता स्थापन केली त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा झटका होता, असे मानले जात होते. त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजीव दादा देशमुख हे निवडून आल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी कडे जनतेचा कौल असल्याचे दिसून आले. मात्र त्यानंतर चाळीसगाव शहराच्या व राजकारणाच्या अस्मितेचा विषय असेलेली चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळेल अशी चर्चा व शाश्वती आमदार आणि भाजपाला वाटत असताना शहरातील जनतेने 34 पैकी 17 जागा आघाडीला देऊन राजीवदादा देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला यावेळी त्यांना कमी जागा मिळाल्या असल्यातरी सत्ता स्थापनेसाठी भाजपाला मोठी कसरत करावी लागली. बहुमतासाठी भाजपने शर्तीचे प्रयत्न करून सेनेचे 2 व अपक्ष 2 असे 4 उमेदवार सोबत घेऊन 45 वर्षाची सत्ता मोडीत कडून नगरपालिकेवर भाजपचा झेंडा रोवला असला तरी हे यश एकट्या भाजपचे नसल्याने येथे देखील राष्ट्रवादीला बर्यापैकी बहुमत असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार भाजपचे असले तरी भाजपातील अंतर्गत कलह भाजपाला नडला व राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेत 4 तर पंचायत समितीत बरोबरीच्या 7 जागा मिळाल्याने तालुक्यातील जनतेने राष्ट्रवादीकडे आपला कल असल्याचे दाखून दिले आहे. त्यामुळे येणार्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना सारखी कसरत करावी लागणार हे मात्र निश्चित आहे.
– सूर्यकांत कदम, 9860791864