चाळीसगावात भुसार मालाची आवक

0

चाळीसगाव : तब्बल 1 महिन्यापासून बंद असलेले भुसार मालाची आवक मंगळवार 13 डिसेंबर 2016 पासून चाळीसगाव बाजार समितीत सुरु झाली असून भुसार मालासह थोड्याफार प्रमाणात कडधान्य विक्रीस आले होते. महिनाभर भुसार मालाचा व्यवहार बंद असल्याने मार्केट फी मिळाली नाही म्हणून समितीचे जवळ पास 20 लाखावर नुकसान झाले आहे. दरम्यान गेल्या महिन्याभरापासून बाजार समिती भुसार मालाचे लिलाव बंद होते मात्र आता मोठ्या प्रमाणावर ज्वारी, बाजरी, सोयाबीन, सूर्यफूल व कडधान्य मोठ्या प्रमाणावर विक्रीस येतील असा अंदाज होता. मात्र चेक व आरटीजीएसच्या व्यवहारामुळे शेतकर्‍यांनी जास्त माल समितीत आणला नाही. गेल्या महिन्याभरापासून काही प्रमाणात बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने मार्केट फीच्या स्वरूपात मिळणारी फी मध्ये घट होऊन समितीचे जवळपास 20 लाख रुपयांचे उत्पन्न कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कृउबात मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर
गेल्या महिन्या भरापासून चाळीसगाव बाजार समितीत भाजीपाला कांदा व मक्याचे मार्केट (लिलाव )सुरु होते. त्या सर्वांचा व्यवहार हा धनादेश (चेक) व आर टी जी एस द्वारे सुरु होते. शेतकर्‍यांना मजुरांना देण्यासाठी व मार्केटमध्ये माल आण्यासाठी लागणारे भाडे हे रोख स्वरूपात किंवा 100, 50 च्या नोटा मिळत नसल्याने समितीच्या व्यवहारांवर फरक पडला होता या महिना भरात कांदा मका व भाजीपाला व्यवहारात शेतकर्‍यांवर प्रमाणे पेमेंट दिले जात होते आज मंगळवार 13 डिसेंबर 2016 पासून चाळीसगाव बाजार समिती भुसार मालाची आवक सुरु झाली असून सायंकाळी 4 वाजेपर्यंत 700 ते 800 क्विंटल बाजरीची आवक झाली असून किमान भाव 1100 रुपये ते कमाल भाव 1320 रुपये काढण्यात आला होता त्याच प्रमाणे ज्वारीची आवक 1000 ते 1200 क्विंटल भाव 1200 ते 1350 सोयाबीन 15 ते 20 क्विंटल यांचा भाव 2700 ते 2750 पर्यंत काढण्यात आला होता. आज भुसार मालाचा आवक असण्याचा पहिला दिवस असल्याने सूर्यफूल व कडधान्य किरकोळ स्वरूपात दाखल झाले होते. मक्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरु असून आज 3500 क्विंटलच्या जवळ पास मका बाजारात दाखल झाला असून त्याचा भाव 1100 ते 1250 पर्यंत होता.

गुरांच्या बाजारातही घट
नेहमी प्रमाणे चाळीसगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर गुरांचा बाजार भरत होता. त्यामुळे फी स्वरूपात बर्‍यापैकी उत्पन्न बाजार समितीचे येत होते पण गेल्या महिना भरापासून हजार पाचशेच्या नोट बंदी मुले गुरे मालकांना देण्यासाठी व्यापार्‍यांकडे पैसे नाहीत तसेच गुरे घेणार्‍या शेतकर्‍यांकडे देखील पैसे उपलब्ध नसल्याने बाजार समितीत आलेले गुरे, बकर्‍या या मालकांना माघारी घेऊन जाण्याची वेळ आली आहे. गुरांचे सौदे होतात मात्र अगोदरच आपल्याकडे हजार पाचशेच्या नोटा असतील तर व्यवहार होणार नाही त्यावर आपणास चेक देऊ असे सांगितल्यावर देखील गुरे मालक चेक घेण्यास तयार नसल्याने गुरांचा बाजारावर देखील मोठा परिणाम झाला आहे.