दुचाकी अपघातात चाळीसगावातील दोन तरुण ठार

0

हेल्मेट असते, तर वाचले असते तरुणांचे प्राण

चाळीसगाव – मोटरसायकल झाडावर आदळून झालेल्या अपघातात हिरापूर रोड परिसरातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी, दुपारी देवळी-आडगाव दरम्यान घडली. हे दोघे तरुण मालेगाव येथून काम आटोपून चाळीसगावला परतत होते. वैभव देशमुख व आदित्य वरसाळे, अशी त्यांची नावे आहेत.
चाळीसगावच्या आदर्शनगर भागातील रहिवासी बेलगंगा साखर कारखान्याचे माजी कर्मचारी माधवराव देशमुख यांचा मुलगा वैभव हा जिओ मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये काम करायचा. त्याची आई राष्ट्रीय विद्यालयात शिक्षिका आहे. दुसरा मयत तरुण आदित्य मधुकर वरसाळे हा हिरापूर सबस्टेशन भागातील हरिमाला नगरात कुलस्वामिनी मंगल कार्यालयाजवळ राहात होता. या तरुणाचे वडील वारले आहेत. आदित्य हा गाडीचालक सचिन शिंदे यांचा भाचा आहे. गणेश शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आदित्यने गोपाल मोबाईल सर्व्हिस सेंटर हे नवीनच दुकान सुरू केले होते. वैभव व आदित्य हे दोघे मित्र अविवाहित होते.

दुचाकी झाडावर आदळली, दोघांच्या डोक्याला जबर मार

घटनास्थळावर झालेल्या अपघाताचे दृश्य पाहता दुचाकी निंबाच्या झाडावर आदळल्याचे दिसत आहे. दोन्ही तरुणांच्या डोक्याला जबर मार लागला असून, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या तरुणांनी हेल्मेट घातले असते तर त्यांचे प्राण वाचले असते, अशी चर्चा घटनास्थळी होती.