चाळीसगाव। शहरातील नागद रोड वरील पाण्याच्या टाकी खाली विनापरवाना अवैध रित्या देशी दारू ची विक्री करीत असतांना 2 जून 2017 रोजी दुपारी 1 वाजता आरोपी अरुण श्रीपत कोळी (44) वाल्मिक नगर चाळीसगाव यास 780 रुपये किमतीच्या टँगो पंच देशी दारूच्या 15 बाटल्यांसह ताब्यात घेतले आहे.
दुसर्या कारवाईत दुपारी दीड वाजता नागद रोड वरील पाण्याच्या टाकीजवळ टपरीच्या आडोशाला सट्टा मटका घेत असतांना आरोपी आबा एकनाथ आगोने (27) रा आठवडे बाजार चाळीसगाव यास 380 रुपये रोख व सट्टा मालकाच्या साधनांसह ताब्यात घेण्यात आले आहे. तिसरी कारवाई चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केली असून 2 जून 2017 रोजी दुपारी 1:45 वाजेच्या सुमारास तालुक्यातील घोडेगाव येथे रमेश अशोक पवार हा त्याच्या घराच्या मागे सट्टा मटका घेत असतांना ग्रामीण पोलिसांनी छापा मारला. आरोपीने तेथून पलायन केले असून पोलिसांनी घटना स्थळावरून 290 रुपये रोख व सट्टा मटका जुगाराची साधने ताब्यात घेतले आहे व वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाळीसगाव शहर व ग्रामीण पोलीस करीत आहे. पोलिसांकडून तीन ठिकाणी सट्टा व दारू अड्ड्यांवर कारवाईमुळे सर्वस्थरावरून अभिनंदन होत आहे.