चाळीसगावात सहा जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव

0

एकावर हद्दपारीची कारवाई : ५७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

चाळीसगाव- आगामी लोकसभा निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या अट्टल गुन्हेगारांवर व संशयित आणि निवडणूक काळात ज्यांच्यापासून उपद्रव होऊ शकतो अशा ५७ जणांवर कलम ११०,१०७ तसेच ९४ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत तर सहा जणांचे हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव यांच्याकडे पाठवले आहेत. त्यातील चार जणांना नोटिसा बजावल्या आहेत.तर एकावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुका हा संवेदनशील तालुका मानला जात असल्याने आगामी लोकसभा निवडणूक काळात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. शहरी अनेक भागात भाईगिरीने डोके वर काढले आहे.त्यामुळे वरवर लहान वाटणार्‍या मारमारीच्या नंतर पोलिसांची डोकेदुखी ठरत असल्याचे प्रकार नेहमी घडतात. या सर्वांवर पोलिसांची करडी नजर आहे.
पंधरा दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अशा गुन्हेगारांवर वचक ठेवला जात आहे. तसेच ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत व पोलिसांच्या तपास यादीत फरार असलेले गुन्हेगार कायदा व सुव्यस्थेचा भंग करून गावात दहशत निर्माण करणारे व निवडणूक काळात मतदान केंद्रांवर उपद्रव घालू नये, मतदारांना त्यांच्या पासून त्रास होवु नये असे गुन्हेगार व संशयित यांच्यावर चाळीसगाव पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्याचप्रमाणे फरार गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.

४६ जणांवर कारवाई
ज्यांच्यापासून कायदा व सुव्यवस्थेचा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा ११ जणांवर नोटिसा बजावून सीआरपीसी कलम ११० नुसार व कलम १०७ प्रमाणे ३५ जणांवर तर दारूबंदी कायद्यान्वये कलम ९३ नुसार पाच जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जे अट्टल गुन्हेगार आहेत अशा सहा जणांविरोधात प्रांताधिकारी चाळीसगाव यांच्याकडे हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते त्यापैकी ४ जणांना नोटिसा बजावल्या असून उर्वरित दोन जणांचे प्रस्ताव येण्याचे बाकी असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड यांनी दिली. मागील काळात टाकळी प्र. चा. येथील ग्रामपंचायत सदस्य शाम नारायण गवळी याचा हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता, त्याला प्रांत अधिकार्‍याकडून मंजुरी मिळाली असून त्याला तीन महिन्यासाठी हद्दपार करण्यात आल्याचेही ठाकूरवाड यांनी सांगितले.
चाळीसगाव शहरात गेल्या काही काळापासून वाढत्या अवैध व्यवसाय व गुन्हेगारी कारवायांमुळे शांततेला गालबोट लागत असून शहरात गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे दिसत आहे. सध्यस्थितीत चाळीसगाव शहर व तालुक्याची ओळख गुन्हेगारी व अवैध धंद्यांचा अड्डा अशी झाली आहे. तरुणांकडून सर्रासपणे धारदार शस्त्रांचा वापर केला जातो आहे. याप्रकरणी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहे. सट्टा जुगार, गुुुुटखा, वाळू चोरी करणार्‍या तसेच अवैध दारू विक्रीने शहरासह ग्रामीण भागात कहर केला असतांना गेल्या काही दिवसात गांजा प्रकरणे उघडकीस आले आहेत. या गांजा प्रकरणाने चाळीसगावची इभ्रत राज्यभरात वेशीवर टांगली गेली. गांजा तस्करी प्रकरणात चाळीसगावच्या तरुणाईचा असलेला सहभाग हा चिंतेचा विषय ठरला आहे. आंधप्रदेश, राजस्थान अशा राज्यांमध्ये गांजा तस्करीची पाळेमुळे पोहचली आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांपाठोपाठ गांजा तस्करीचे माहेरघर बनल्याचीही चर्चा होत आहे. वाळू तस्करीने तालुुक्यात कहर केला असून अनेक तस्कर मोकाट झाले आहेत. आजही चढ्या भावाने जामदा व गिरणा नदी पात्रातील काही गावातून वाळूू चोरी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा तालुक्यात सु रू आहेे
ही सर्व परिस्थिती लक्षात घेता लोकसभा आणि त्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडणे पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान ठरले आहे. अवैध धंद्यांचे माहेरघर अशी असलेली ओळख पुसण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी नजीर शेख,शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासह चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाणे व मेहूणबारे पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना कसरत करावी लागणार आहे .खून व दरोडा, चोरी सारख्या गुन्ह्यातील अनेक अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलीसांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली असली तरी शहरासह तालुक्याच्या शांततेला बाधा ठरणार्‍या गुन्हेगारी वृत्तीवर वचक ठेवण्याची अपेक्षा जनतेतून होत आहे.