चाळीसगावात हागणदारीमुक्तीचा बोजवारा!

0

चाळीसगाव (सूर्यकांत कदम) । चाळीसगाव – मार्च 2018 पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार नुकतेच महाराष्ट्रात हागणदारीमुक्ती झाल्याचेही घोषित करण्यात आले होते. मात्र, चाळीसगावात या हागणदारीमुक्तीचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे खुद्द प्रशासनाच्या कारभारावरूनच समोर आले आहे. चाळीसगाव तालुक्यातील 107 गावांपैकी केवळ 56 गावांनाच हागणदारीमुक्तीचा दाखला देण्यात आला असून 24 ग्रामसेवकांसह 3 विस्तार अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. अशी परिस्थिती असताना महाराष्ट्राला हागणदारीमुक्त घोषित कशाच्या बळावर केले? असा सवाल विरोधकांकडून, जनतेकडून विचारला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे तालुक्यात 7 हजार लाभार्थ्यांची रक्कम अद्याप वाटप झाली नसल्याचे समोर आले आहे.

अजून कामेच सुरू नाही
बर्‍याच गावामध्ये शौचालयांची कामे अजुन सुरु झाली नाहीत खरे पाहता ग्रामपातळीवर शासनाच्या स्वच्छ भारत अभियानानुसार ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना गाव हागणदारीमुक्तीसाठी वैयक्तीक लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी परावृत्त करायला हवे होते, मात्र तसे न झाल्याने अनेक लाभार्थी या लाभापासुन वंचीत राहीले 24 ग्रामसेवक व 3 विस्तार अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीसा बजावुन आपल्या 2 वेतनवाढ का कमी करु नये अशा नोटीसा बजावल्या आहेत. असे असले तरी 2017/2018 या वर्षात 6 कोटी रुपये वाटप झाले आहेत मात्र अजुन 10 कोटी रुपये येणे अपेक्षित असताना ते मात्र आले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बिडीओंची माहिती : चाळीसगाव तालुक्यात स्वच्छ भारत योजने अंतर्गत केंद्र सरकारच्या सामाजिक, आर्थिक सर्व्हेक्षणानुसार मंजुर 8 हजार शौचालयांपैकी फक्त 10 हजार शौचालयांचे पैसे वाटप झाले असून या योजनेचा पैसाच उपलब्ध न झाल्याने चक्क 7 हजार लाभार्थ्यांची रक्कम अद्याप वाटप झाली नाही. 31 मार्च पर्यंत या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण न करणार्‍या 24 ग्रामसेवक व 3 विस्तार अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी दैनिक जनशक्तीशी बोलताना दिली आहे.

अशी आहे स्थिती :
सर्व्हेक्षणाानुसार चाळीसगाव तालुक्यात एकूण 8 हजार शौचालये मंजुर करुन 31 मार्च 2018 पर्यंत या शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश ग्रामसेवक यांना देण्यात आले होते मात्र यापैकी तालुक्यात फक्त 1000 लाभार्थ्यांना आतापर्यंत 6 कोटी रुपये वाटप झाले असून 107 ग्रामपंचायत पैकी फक्त 56 ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्याचा दाखला एनजीओने पाहणी करुन दिला आहे म्हणजेच जवळपास 7000 गावे यात नाहीत यातील 1600 ते 2000 शौचालय पूर्ण झाल्याचे प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाले असल्याची माहिती गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी दिली आहे. पैकी अजुन 41 ग्रामपंचायती मध्ये 6 ते 7 हजार शौचालयांचे प्रस्ताव येणे बाकी असून त्यात शौचालयांची सुरु असलेली कामे, अपूर्ण कामे, बंद कामे अशा कामांचा समावेश आहे.

ग्रामस्थांनी 12 हजार रुपये स्वतः खर्च करुन वैयक्तीक शौचालय तयार करुन घ्यावे, पूर्ण झाल्यावर शौचालय अनुदानाची मागणी केल्यास शासन स्वच्छ भारत योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना पैसे देणास बांधील आहे. ज्या ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांनी कामातकुचराई केली असेल त्यांना रितसर नोटीसा बजावल्या आहेत. शासनाकडुन या योजनेचा पैसा आल्यावर लवकरच संबंधीत लाभार्थ्यांच्या खात्यावर व ग्रामपंचायतकडे पैसा वर्ग करण्यात येणार आहे
अतुल पाटील
गटविकास अधिकारी (वर्ग 1)
पंचायत समिती चाळीसगाव