चाळीसगाव। चाळीसगाव येथील सिग्नल चौकात धुळे रोड व स्टेशनरोड यामधील त्रिकोणी जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा व्हावा, यासाठी आणाभाऊसाठे स्मृतिदिनी संभाजी सेनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी नियोजित जागेवर मंगळवार 18 जुलै 2017 रोजी होमहवन आंदोलन करण्यात आले. शासनाच्या कला संचनालयाच्या यादीत असलेला भव्य दिव्य असा शिवाजी महाराजांचा पुतळा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा चाळीसगाव येथील सिग्नल चौकातील नियोजित जागेवर व्हावा. या मागणीसाठी संभाजी सेना अनेक वर्षापासून सातत्याने लढा देत असून शेकडो पत्रव्यवहार केल्यानंतर कोणतीही दखल घेतलेली नसल्याने होमहवन करण्यात आले.
नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मागणी
संभाजी सेनेने 21 दिवस उपोषण, 21 संभाजी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आत्मदहन आंदोलन देखील केले होते. परंतु त्यानंतरही काही हालचाल न झाल्याने संभाजी सेनेने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार 18 जुलै 2017 रोजी समाज प्रबोधनकार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनी शिवाजी महाराज पुतळा नियोजित जागेवर चक्क होमहवन आंदोलन केले. याठिकाणी मंडप उभारुन स्टेज बनवण्यात आला व 5 ब्राम्हणांच्या हस्ते 5 जोडपे बसवुन पुजा अर्चा करुन होमहवन करण्यात आले. याठिकाणी पूजेसाठी बापुराव पाटील ढोमणेकर, संदीप जाधव चाळीसगाव, अविनाश काकडे चाळीसगाव, नामदेव पाटील तमगव्हाण, बापु कुमावत तांबोळे हे चौघे सपत्नीक बसले होते. सकाळी 10 वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या हस्ते करुन पुजापाठ व होमहवन आंदोलनास सुरुवात झाली. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने चाळीसगावकरांचे लक्ष वेधुन घेतले होते.
यांनी घेतले परीश्रम
यावेळी आंदोलन यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण शिरसाठ, गिरीष पाटील, सुनिल पाटील, अनिल शिरसाठ, विजय गवळी, रवींद्र शिनकर, सुरेन्द्र महाजन, सुरेश पाटील, राहुल अहिरे, दिवाकर महाले, ज्ञानेश्वर पगारे, विष्णु महाले, ज्ञानेश्वर अहिरे, पुरुषोत्तम अहिरे, भरत नेटारे, विजय देशमुख, सुरेश तिरमली, रवि नाईक, हरिश चंदनशिव आदींनी परिश्रम घेतले.