चाळीसगावात 92 लाखांच्या गुटख्यासह कंटेनर चालक जाळ्यात

भुसावळ/चाळीसगाव : चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गुटख्याची तस्करी रोखत तब्बल 92 लाख 34 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला असून कंटनेर चालकाला अटक केली आहे तर 20 लाखांचा कंटेनरसह एकूण एकूण एक कोटी 12 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आस्ताक उमर मोहमद (हतीम, जि.परवळ, हरीयाणा) असे अटकेतील कंटेनर चालकाचे नाव आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई केली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना उदयपूर राजस्थान येथून मुंबईकडे चाळीसगावमार्गे अवैध गुटख्याची अवैध वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले. नितीन आमोदकर, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार, हवालदार युवराज नाईक, भूपेश वंजारी, पे्रमसिंग राठोड यांच्या पथकाने चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावर रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास नाकाबंदी केल्यानंतर बेलगंगा साखर कारखान्याच्या पुढे रस्त्यावर कंटेनर (एच.आर.38 ए.बी.2190) हा ताब्यात घेवून कंटेनर चालक आस्ताक उमर मोहमद याची चौकशी केल्यानंतर त्यांने उडवा-उडवीची उत्तरे दिल्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्यात कंटेनर आणून त्याची झडती घेण्यात आली. गोवर्धन बोरसे यांच्या फिर्यादीनुसार कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

92 लाखांचा गुटखा जप्त
शासकीय पंचनामा पूर्ण करून कंटनेरचे सील तोडले असता त्यात 150 प्लास्टीक बारदानात 9 टन गुटखा मिळून आला. त्याची किंमत 92 लाख 34 रूपये इतकी आहे हा गुटखा व 20 लाख रूपये किंमतीचा कंटेनर असा सुमारे 1 कोटी 12 लाख 34 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, एपीआय रमेश चव्हाण, एपीआय धरमसिंग सुंदरडे, पोलिस उप निरीक्षक लोकेश पवार, युवराज नाईक, पोलिस नाईक नितीन आमोदकर, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार, भुपेश वंजारी, प्रेमसिंग राठोड आदींनी ही कारवाई केली.