चाळीसगावात सिनेस्टाईल पाठलागानंतर 82 लाखांचा गुटखा जप्त

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : जिल्ह्यात गुटखा माफिया सक्रिय

चाळीसगाव : भुसावळात अलिकडे सव्वादोन कोटींचा गुटखा पकडण्यात आल्याची घटना ताजी असताना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कंटेनरचा सिनेस्टाईल पाठलाग करीत गुटख्याने भरलेला कंटेनर जप्त केला आहे. या कंटेनरमधून तब्बल 82 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आल्याने गुटखा माफियांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोमवार, 4 रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कंटेनर चालक सरपू खा इद्रीस खा (40, राजस्थान) यास अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक तपासकामी मालेगाव रोड येथे सोमवारी रात्री गेलेले असतांना मालेगाव रोडवरील बेलगंगा कारखान्याजवळ कंटेनर (एच.आर.38 ए.बी.6096) संशयीतरीत्या भरधाव वेगाने जात असताना पथकाने थांबण्याचा इशारा केला मात्र वाहन चालकाने वाहन न थांबवता पळ काढल्याने संशय बळावल्याने पोलिसांनी पाठलाग करून कंटेनर अडवले व त्याची तपासणी केली असता त्यात गुटखा आढळल्याने वाहन जप्त करून पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

82 लाखांचा गुटखा जप्त
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कंटेनर चालकास पोलिस ठाण्यात आणल्यानंतर शासकीय पंचांसमक्ष कंटेनरचे लॉक उघडले असता त्यात 130 प्लास्टीक बारदानात एकूण किंमत 82 लाख 25 हजार 100 रुपये किंमतीचा राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा आढळल्याने तो जप्त करण्यात आला तर दोन लाख रुपये किंमतीचे कंटेनर मिळून एकूण एक कोटी दोन लाख 25 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाईक नितीन किसन आमोदकर यांच्या फिर्यादीनुसार कंटेनर चालक सरपू खा इद्रीस खा (40, राजस्थान) विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाली पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार करीत आहेत. दरम्यान, गुटख्याची वाहतूक नेमकी कुठून व कुठे केली जात होती शिवाय हा गुटखा नेमका कुणाचा आदी प्रश्न अनुत्तरीत असून कंटेनर चालकाला पोलिस कोठडी मिळाल्यानंतर या प्रश्नांचा उलगडा होणार आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, एपीआय रमेश चव्हाण, एपीआय धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, नाईक नितीन किसन आमोदकर, गोवर्धन राजेंद्र बोरसे, शांताराम सीताराम पवार, प्रेमसिंग राठोड यांच्या पथकाने केली.