चाळीसगाव कृउबात कांद्याची आवक वाढली

0

चाळीसगाव । इतर जिल्ह्यातील मार्केटच्या तुलनेत चाळीसगाव कृउबा सामिती मधल्या बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून मागिल लिलावाच्या तुलनेत 19 डिसेंबर 2017 रोजी बाजारात तब्बल 300 वाहने कांदा विक्रीस आला असून मागील लिलावात 200 वाहने आली होती. 100 वाहनांची वाढ झाल्याने 19 डिसेंबर रोजी 3 हजार रूपये शेवटच्या भाव देण्यात आला. आवकमध्ये जवळपास 85 टक्के कांदा हा मालेगाव व नांदगाव जिल्ह्यातील होता. चाळीसगाव कृउबा समितीच्या वतीने नागदरोड वरील कांदा मार्केट सुरू केले आहे. या मार्केटमध्ये राज्यातील इतर बाजार समितीच्या तुलनेत जादा भावाची बोली कांद्याला मिळाली होती व मिळत देखील आहे.

इतर मार्केटच्या तुलनेत चाळीसगाव मार्केटला जादा भाव
2 दिवसांपुर्वी झालेल्या कांदा लिलावात जवळपास 300 वाहने म्हणजेच 3 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यावेळी शेवटची बोली लिलावमध्ये 3 हजार रूपये झाली होती. सर्वात जास्त भाव देणारी चाळीसगाव कृउबा समितीचा लिलाव असल्याने इतर जिल्ह्यातील शेतकरी या समितीच्या बाजारात आकर्षित झाले आहेत. 19 डिसेंबर कांदा लिलावात जवळपास 300च्या वर वाहने ही नांदगाव व मालेगाव तालुक्यातील असल्याने सुत्रांनी सांगितले. 19 रोजी लिलावाचा सुरूवात झाल्यानंतर सर्वात कमी बोली ही 1500 रूपयांपासून सुरू होऊन 2200 रूपये ते 3 हजारपर्यंत बोली लागून सर्वात शेवटची बोली 3250 रूपये लागल्याने 2 दिवस आगोदर झालेल्या लिलावाच्या तुलनेत 250 रूपयांची बोली जास्ती लागली असून इतर मार्केटच्या तुलनेत चाळीसगाव मार्केटला जादा भाव मिळत असल्याने उंबरेध, चिंचगव्हाण ता. मालेगाव येथील शेतकरी संजय शेरेकर, चौत्राम पाटील विठ्ठल ताडगे यांनी दैनिक जनशक्तिशी बोलतांना दिली.

वेळेवर पैस मिळत असल्याचे समाधान
चाळीसगाव बाजार समितीत कांदा लिलावात जसा माल आहे तसा रितसर भाव मिळतो. इतर मार्केटमध्ये मनमानी होते. व्यापार्‍यांकडून वेळेवर पैस मिळत नाहीत चेक बाऊंन्स होतात. शेतकर्‍यांना अरेरावी केली जाते. म्हणून आम्ही चाळीसगाव बाजार समितीच्या कांदा लिलावात आमचा कांदा आणला आहे. या ठिकाणी आम्हाला चांगला भाव मिळतो. व्यापारी व कर्मचार्‍यांकडून चांगली वागणू मिळते. कांदा ठेवायला जागा उपलब्ध आहे. पैसे वेळेवर मिळतात म्हणून आम्ही या ठिकाणी आमचा कांदा विक्रीसाठी आणल्याचे त्यांनी सांगितले.

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बाजारात मागच्या लिलावाच्या तुलनेत जवळपास 100 वाहने जास्त आली असून 18 डिसेंबर रोजी 200 वाहने होती तर आज 19 डिसेंबर रोजी 300 वाहने कांदा बाजारात दाखल झाला आहे. त्यात सर्वाधिक कांदा मालेगाव, नांदगाव व इतर तालुक्यातील म्हणजेच 85 टक्के कांदा हा बाहेरिल तालुक्यातील आहे. या ठिकाणी शेतकर्‍यांना न्याय देण्याची भुमिका असते
– अशोक पाटील
सहाय्यक सचिव, कृउबा, चाळीसगाव

इतर बाजार समितीच्या तुलनेत आमच्याकडे भाव जादा लिलावात बोलला जात आहे. त्यामुळे नांदगाव, मालेगाव, कन्नड, पाचोरा, भडगाव आदी तालुक्यातून कांदा विक्रीसाठी येत आहे. शेतकर्‍यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न असतो. म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी घेऊन येत आहे.
– रविंद्र पाटील
सभापती, कृउबा, चाळीसगाव