चाळीसगाव- शहरातील नागद रोड वरील वाईन शॉपीसमोर 12 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास एकावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेतील मुख्य आरोपी संभा देशमुख अद्याप पसार असला तरी त्यास आश्रय देणार्या दोघांना चाळीसगाव शहर पोलीस व एलसीबीच्या पथकाने शहरातील रामवाडी परीसरातुन अटक केली असून न्यायालयाने त्यांना 17 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. महिन्याभरापुर्वी कृष्णा अविनाश जाधव याच्या भावाचा संभा देशमुख या तरूणाशी वाद झाला होता. त्यावेळी संभा देशमुख यास मारहाणदेखील करण्यात आली होती. त्याचा राग मनात धरून 11 जुलै रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास संभा देशमुख व कृष्णा जाधव यांची शाब्दीक चकमक झाली आणि त्यानंतर संभा देशमुख याने स्वत:जवळील गावठी बंदुकीतून कृष्णा जाधववर तीन गोळ्या झाडल्या हेात्या तर कृष्णा जाधव हा गंभीर जखमी झाला आहे.
दोघांना अटक
घटना घडल्यानंतर मुख्य आरोपी संभा देशमुख पसार असून योगेश भीमराव पांचाळ (24, रा.रामवाडी) तर दर्शन ऊर्फ साई मनोज पाटील (21, रा.रामवाडी) या दोघांनी आरोपी संभा देशमुख यास गुन्हा करून आल्यानंतर त्यास आश्रय दिला तसेच आरोपी याने नांदगाव येथे जाण्यासाठी मला मदत करा, असे सांगितल्याने वरील दोघे आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने 17 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य आरोपी संभा देशमुखच्या मागावर पोलीस आहेत.