शिंदी गावात 50 रुपयात 200 लिटर पाणी
वीस गावात एकवीस टँकर सुरू : पंधरा गावात विहीर अधिग्रहण
चाळीसगांव – तालुक्यातील गिरणा नदी जवळील गावांच्या पाणी प्रश्न सोडला तर तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या असून गावकर्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर तहसील कार्यालयाकडून 20 गावात 21 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच या गाव परिसरात 15 विहिरी अधिग्रहण करण्यात आले आहेत. गरज भासेल व मागणी करण्यात येणार्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा अशी परिस्थिती अनेक गावात दिसून येत आहे. दरम्यान शिंदी गावात शासनाने टँकरने पाणीपुरवठा करून देखील नागरिकांना 50 रुपयात 200 लिटर पाणी विकत घ्यावे लागत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
20 गावांना टँकरने पाणीपुरवठा
तालुक्यातील नाईक नगर तांडा नंबर वन, ब्राम्हण शेवगे,रोहिणी, हातगाव,विसापूर तांडा भिल्ल वस्ती,अंधारी, करजगाव, चितेगाव, चिंचगव्हाण, तमगव्हाण,सुंदर नगर, चितेगाव, पिंपळगाव, घोडेगाव, न्हावे, दस्के बर्डी, खेडी खुर्द, वाघळी, तलोंदे प्रदे, पिप्री बुद्रुक प्र दे, ढोमणे या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर पिंप्री प्र चा, बोढरे,तळेगाव, सुंदर नगर, चींचगाव्हण, हिरापुर, शिंदी, राजमाने, चातृभुज तांडा शिवापूर, राजदेहरे, टुका तांडा, तलोंदे प्रचा रामनगर, ढोमने, नाईक नगर तांडा नंबर दोन या गावांना विहीर अधिग्रहित करण्यात आल्या असून त्यापैकी अनेक विहिरींनी तळ गाठला आहे.
पाणी विकत घ्यावे लागतेय
तालुक्यात पिण्याची पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने गावकर्यांसह प्रशासनाची हतबलता वाढली आहे. अनेक गावात शासनाने टँकरने पाणीपुरवठा करून देखील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाच हजार लोकवस्तीचे गावात ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. हेच हाल कमी अधिक प्रमाणात अनेक गावात दिसून आली आहे. याचा प्रशासनाने शोध घेऊन त्या गावांना अधिक संख्येने टँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे झाले आहे. गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून गावात पाणी टंचाईने भीषण रूप धारण केली आहे. त्यामुळे पन्नास रुपयात दोनशे लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे अशी माहिती गावकरी भाऊसाहेब नवले यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलताना दिली. तर विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावाजवळच्या विहिरीत पाणी जमा होण्याची वाट पहावी लागते आहे. त्यातून दूषित पाणी जमा करून गोरगरीब परिवार हे पाणी पीत असल्याने त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली असल्याची भावना माजी सरपंच गोरख राठोड यांनी व्यक्त केली आहे.
प्रस्ताव सादर करा – तहसिलदार अमोल मोरे
ज्या गावांना पिण्याची पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली असेल अशा गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यात बाबतचा प्रस्ताव पंचायत समितीच्या माध्यमातून सादर करावे. त्याची चौकशी व पाहणी करून त्या गावांना तातडीने पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची तजवीज केली जाईल अशी माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलताना दिली आहे.
पानी फाऊंडेशनने कंबर कसली
तालुक्यातील अभोने गाव,अभोणे तांडा, कुंझर,वरखेडे वाघळी,बोरखेडा खुर्द ,सांगवी, रांजणगाव, गणेशपुर,तांबोळे या गावांसह सुमारे सत्तर गावांमध्ये पाणी फाउंडेशन ने गावकर्यांच्या सहकार्याने चळवळ सुरू केली असून भविष्यातल्या पाणीटंचाई वर मात करण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरत असल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातील नेहमी टंचाईग्रस्त गावांमध्ये दिसून येत आहे. यासाठी तालुका समन्वयक विजय कोळी, सुनील पाटील, महादेव मोरे, बबलू पाटील, निलेश पगारे, सोमाजी भसारकर व गावकरी परिश्रम घेत आहेत.