चाळीसगाव: जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण राष्ट्रीय महाविद्यालय, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रीय विद्यालय, चाळीसगाव येथे लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दरमहा प्रकाशित होणारे लोकराज्य मासिक हे राज्यातील पहिल्या व देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक खपाचे मासिक आहे. या मासिकात शासनाच्या लोकोपयोगी योजनांची माहिती, विविध विषयांवर आधारित लेख, यशकथा, शासन निर्णय आदिंचा समावेश असतो. वाचक, स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व मुलाखतींना सामोरे जाणारे उमेदवार यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त माहिती या मासिकात असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी लोकराज्य मासिकाचा संदर्भग्रंथ म्हणून उपयोग करीत असतात.
पत्रकारांनाही दैनंदिन घडामोडींची माहिती माध्यमांमधून देण्यासाठी संदर्भ म्हणून लोकराज्य मासिकातील माहिती उपयुक्त ठरणार असल्याने चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी यांनी मंडळाच्या सर्व सभासदांना लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार करुन घेण्याचा निर्णय घेतला व त्यांनी कार्यक्रमातच सर्व सभासदांची लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणीची रक्कम जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचेकडे सुपूर्द केली.
राज्यात आतापर्यंत प्रथमच चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाचे सर्व सदस्य लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार झाल्याने चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळ हे राज्यातील पहिले ‘लोकराज्य वृत्तपत्रकार मित्र मंडळ’ ठरले आहे. याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले व लोकराज्य मासिकाचा अंक देऊन आभारही व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव, चाळीसगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, मंडळाचे सचिव एम. बी. पाटील, माहिती सहायक राजेंद्र सोनार, दैनिक जनशक्तिचे चाळीसगाव विभागीय कार्यालय उपसंपादक तथा मंडळाचे सहसचिव अर्जुन परदेशी आदि उपस्थित होते.