चाळीसगाव । शेतकरी बांधवांचे बि-बियाणे, औषधी खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती तालुक्यातील बहुतांश भागात असतांना नजर आणेवारी 50 टक्के पेक्षा जास्त जाहिर केली असुन कमीत कमी अंतिम आणेवारी तरी स्थानिक परिस्थिती पंचनामा करुन खरी आणेवारी जाहिर करावी अशा आशयाचे निवेदन शेतकरी सुकाणु समिती,लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांना देण्यात आले आहे. निवेदनावर विवेक रणदिवे, दिनकर पाटील, शेषराव पाटील, अतुल गायकवाड, सोमनाथ माळी, अॅड.भरत चव्हाण, शरद कासार, विष्णू चव्हाण, महेंद्र चव्हाण, धनराज राठोड व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षर्या आहेत.
खरीप हंगामातील पिके गेली वाया
तालुक्यात यावर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण अत्यल्प असुन चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे, माळशेवगे, तळेगाव हिरापुर, पिलखोड, देवळी, ब्राम्हणशेवगे, रोहिणी, पिंपळगाव आदी भागात तर पिक पुर्णपणे करपली असुन बाजरी, ज्वारी, भुईमुंग, कडधान्य हाताबाहेर गेली आहेत. तसेच नद्या, नाले, धरण, अद्याप कोरडेच आहेत. अशा परिस्थितीत खरीपाची हंगामाची पिके घेणे शक्यच नाही. मागच्या आठवड्यात झालेल्या टंचाई आढावा बैठकीतही हाच सुर उपस्थित सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी लावला होता.पुढेही पाऊस पडला तरी पिकांची श्वास्वती राहीली नसल्यामुळे आणेवारी 50 टक्के पेक्षा कमी अपेक्षित असतांना सरकारी बाबुंनी कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप करण्यात आला.