मुंबई:- चाळीसगाव तालुक्यातील न्हावे ढोमनेत जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या पेयजल योजनेस अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे न्हावे ढोमनेसह आणखी दोन गावांतील जवळपास २० हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. चाळीसगावचे आ. उन्मेष पाटील यांनी या योजनेच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत न्हावे ढोमनेत नळ पाणी पुरवठ्याच्या १२२.२२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्याचा शासन आदेश आज, शनिवारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने काढला आहे.
अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न
न्हावे ढोमने येथे १२२.२२ लाख किमतीच्या अंदाजपत्रकास जळगाव जिल्हा परिषदेने तांत्रिक मान्यता प्रदान केली होती. यानंतर विभागाच्या प्रश्न सचिवांच्या अध्यक्षतेखाली १७ फेब्रुवारी २०१७ रोजी सादर योजनेला मंजुरी देण्यात आली होती. या योजनेचा दरडोई खर्च शासनाच्या निकषापेक्षा जास्त असल्याने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यतेची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यासंबंधी आ. उन्मेष पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. यामुळे २० हजारापेक्षा अधिक नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.
येत्या ३ वर्षात योजना पूर्ण!
या योजनेची अमलबजावणी करण्याचे अधिकारी जळगाव जिल्हा परिषदेला देण्यात आलेले आहेत. योजनेची अमलबजावणी केल्यानंतर खाजगी ठेकेदाराला हे काम देण्यात येणार आहे. या ठेकेदाराला सदर काम ३ वर्षात पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. यासाठी लवकरच ई-निविदा मागविण्यात येणार आहेत. आता या योजनेसाठी शासन स्तरावर लवकर भूसंपादन व इतर परवानग्या प्राप्त करणे आवश्यक आहे. या प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास येत्या तीन वर्षात या परिसरातील लोकांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
या योजनेच्या पूर्ततेसाठी गेल्या ५-६ वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यामुळे २० हजारापेक्षा अधिक लोकांचा पिण्याचा पाण्याचा पश्न मिटणार आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यामुळे या योजनेला मंजुरी प्राप्त झाली आहे. निश्चितच या गोष्टीचा आनंद आहे.
आ. उन्मेष पाटील