भुसावळ/मेहुणबारे : बँक ग्राहकांची फसवणू करून 32 ग्राहकांना सुमारे 62 लाख 61 हजारांचा चुना लावणार्या चाळीसगाव तालुक्यातील बिलखेडा येथील संशयीताला अटक करण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. निलेश युवराज शिंदे (बिलखेडा, ता.चाळीसगाव) अटकेतील संशयीताचे नाव आहे.
बँक मित्राने घातला 62 लाखांचा गंडा
मोटार खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय करणार्या सुदर्शन साहेबराव पाटील (देवळी, ता.चाळीसगाव) यांचे देवळी येथील बँक ऑफ बडोदा शाखेत खाते असून तेथे बँक मित्र म्हणून संशयीत निलेश युवराज शिंदे हा काम पाहत होता. 30 जुन 2021 रोजी सकाळी सुदर्शन पाटील हे त्यांच्या बँकेच्या खात्यात 10 लाखांचा भरणा करण्यासाठी आल्यानंतर त्यावेळी संशयीत निलेशने रक्कम ताब्यात घेवून खात्यात भरण्याचे आश्वासन दिले व रोकड ताब्यात घेतले. आठ दिवसानंतर सुदर्शन पाटील यांना खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे कळताच त्यांनी निलेशला विचारणा केल्यानंतर त्याने आपण शेतकर्यांच्या पीक विम्याचे पैसे भरले, असे सांगितले व एक महिन्यात सर्व पैसे देतो, अशी ग्वाही दिली. दरम्यान, त्याने दिलेल्या चेक देखील अनादर (बाऊंन्स) झाला आणि सुदर्शन पाटील सारख्या 32 बँकेच्या ग्राहकांची सुमारे एकूण 62 लाख 61 हजार 891 रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. यासंदर्भात सुदर्शन पाटील यांनी मेहुणबारे पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर 5 मार्च रोजी संशयीत आरोपी निलेश युवराज शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहितीवरून अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर मेहुणबारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयीत आरोपी निलेश शिंदे याला बुधवारी अटक केली. ही कारवाई मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड, सहाय्यक निरीक्षक चव्हाण, कॉन्स्टेबल मिलिंद शिंदे, गोरख चकोर, शैलेश माळी यांनी केली.