चाळीसगाव तालुक्यातील बारा प्रकल्प कोरडेठाक

0

२० गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू

चाळीसगाव- आज तालुक्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. आजमितीस तालुक्यातील वाघले व वाघला हे दोन प्रकल्प वगळता १४ पैकी १२ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. वाघले-१मध्ये १२.६९ टक्के व वाघला-२मध्ये १३.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. चाळीसगाव तालुक्याच्या पाणी प्रश्न कायमचा निकाली काढणारे व जिल्ह्याला वरदान ठरलेल्या गिरणा धरणांत सद्यस्थितीत अवघा १८.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील दीड महिने या पाणी साठ्यावर चाळीसगाव भडगाव पाचोरासह अनेक गावांची मदार असणार आहे. तर गतवर्षीही हेच प्रमाण १८.३९ टक्के इतके होते.

२० गावामध्ये भीषण पाणीटंचाई
२० गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील नाईक नगर तांडा नंबर वन, ब्राम्हण शेवगे,रोहिणी, हातगाव,विसापूर तांडा भिल्ल वस्ती,अंधारी, करजगाव, चितेगाव, चिंचगव्हाण, तमगव्हाण,सुंदर नगर, चितेगाव, पिंपळगाव, घोडेगाव, न्हावे, दस्के बर्डी, खेडी खुर्द, वाघळी, तलोंदे प्रदे, पिप्री बुद्रुक प्र दे, ढोमणे या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर पिंप्री प्र चा, बोढरे,तळेगाव, सुंदर नगर, चींचगाव्हण, हिरापुर, शिंदी, राजमाने, चातृभुज तांडा शिवापूर, राजदेहरे, टुका तांडा, तलोंदे प्रचा रामनगर, ढोमने, नाईक नगर तांडा नंबर दोन या गावांना विहीर अधिग्रहित करण्यात आल्या असून त्यापैकी अनेक विहिरींनी तळ गाठला आहे.

पुढील दीड महिना खडतर
तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सर्व दूर विविध कामे झाली. मात्र अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागात भीषण पाणी टंचाई कायम राहिली. त्यातच गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान व परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ यामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरू शकली नव्हती. त्यामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभीच धरणातील जलसाठ्यात घट झाली. तालुक्यात दुष्काळाची भयाण परिस्थिती असून, ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. विहिरी, तलाव, बंधार्‍यांनी तळ गाठला आहे. पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तालुक्यात १४ लघु प्रकल्पापैकी १२ प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. मन्याडमध्येही शून्य टक्के पाणीसाठा आहे. केवळ वाघला-१ व वाघला-२ याच प्रकल्पांमध्ये जेमतेम १२ ते १३ टक्के साठा आहे. तालु्नयात दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढतच आहे. तब्बल २० गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.मान्सूनसाठी अद्याप दीड महिन्यांची प्रतीक्षा असून, पुढील काळात तालुकावासीयांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.गिरणा धरणातील सध्यस्थितीत असलेला पाणीसाठा व वाढत्या तापमानामुळे होणारे बाष्पिभवन यामुळे पाण्याची पातळी खलावत चालली आहे.गेल्या महिन्यात गिरणेतून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. आता पुढील आवर्तन मे मध्ये सुटणार आहे.

पाणी टंचाईचे संकट गडद
तालुक्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत चाललेे आहे. त्यामुळे पाण्याची स्थिती दिवसेंदिवस खूपच बिकट होत चालली आहे. कडक उन्हाळा जाणवत असल्याने दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे. काही गावांमध्ये गेले वर्षभर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. भूजल पातळीतही कमालीची घट निर्माण झाली आहे. विहिरी, नद्या, नाले, ओढे यामधील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.पाण्यासाठी नागरिकांसह जनावरांची कासावीस वाढली आहे. दिवसेंदिवस उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने तलाव व विहिरींमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी संबंधित प्रशासनामार्फत योग्य त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान शहरी भागात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने पालिका प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरावे यासाठी ध्वनिक्षेपकावर जनजागृती करावी तसेच नागरिकांनी देखील आपले पुरेसे पाणी भरल्यानंतर नळ बंद करावेत अशी मागणी जाणकार मंडळी सोशल मीडियावर शेअर करीत आहे.