चाळीसगाव तालुक्यातील ४ गावांना पुराचा वेढा; कन्नड घाटात दरड कोसळली

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने मंगळवारी सकाळी गिरणा नदीसह उपनद्या व नाल्यांना मोठा पूर आला आहे. अतिवृष्टीमुळे चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदी काठच्या गावांना पुराचा वेढा पडला आहे. त्यात २ व्यक्ती अडकले असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एसडीआरएफचे पथक बचाव कार्यासाठी पाठविण्यात आले आहे. तालुक्यातील १४ मध्यम जल प्रकल्पांपैकी १० धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. शहरात बामोशी बाबा दर्गाह परिसरासह, मुख्य बाजार पेठ, दोस्त टाकीज परिसर जलमय झाला आहे. भडगाव तालुक्यातील भोरटेक गावालाही पाण्याचा वेढा पडला आहे. दरम्यान चाळीसगाव जवळील कन्नड घाटात मंगळवारी (ता.३१) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तसेच चिखल, राडारोड्यात वाहने अडकल्याचे सांगितले जात आहे. कन्नड घाटातून वाहने आणू नये, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केली असून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे सांगितले आहे.

चाळीसगाव शहर व ग्रामीण भागात मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार कायम राहिल्याने पहाटे डोंगरी व तितूर या नद्यांना मोठा पूर आला. शहराच्या दक्षिणेला असणार्‍या वाघडू, वाकडी, रोकडे, वाघले, बाणगाव येथे गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. मध्यरात्री व पहाटे पूर आल्याने पशुधनाचे नुकसान झाले आहे. तसेच छोटे-मोठे बंधारे पाझर तलाव व इतर छोट्या-मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे, सद्यस्थितीत जामदा बंधार्यावरून १५०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. दुपारनंतर त्यात मोठी वाढ येऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

नदीकाठच्या गावांना पुराचा इशारा

गिरणा नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला असून भडगाव व पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रात दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ दुपारनंतर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तरी सखल नदीकाठावरील गुरेढोरे, जळतंन सामान, चारा तसेच रहिवास हे तातडीने उंच जागी हलवावे व सावध असावे. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती व महसूल प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन सर्वांना अवगत करावे. असे गिरणा पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव इशारा केला आहे.