चाळीसगाव । मिनी मंत्रालय समजल्या जाणार्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या प्रचाराच्या तोेंफा धडाडण्यास सुरूवात झाली असून चाळीसगाव तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणूकीत विकास हा मुद्दा असणार असून दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे. चाळीसगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते तर जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर 4 जागा भाजपच्या ताब्यात होत्या. जि.प.च्या गटांमध्ये भाजपचे तर गणांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. या निवडणूकीत पक्षांनी नविन चेहर्यांना संधी दिल्याने राजकारणाची समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत. चाळीसगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच प्रत्येक पक्षाने आपल्या बहुमत मिळावे यासाठी कंबर कसली असून राष्ट्रवादीने माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराची सुरूवात केली आहे. तर विद्यमान आमदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वात प्रचाराची सुरूवात करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने प्रचाराचे नारळ फोडण्यात आले असून प्रचाराला सभेच्या माध्यमातून सुरूवात झाली आहे.
भाजपाकडून गट व गणांसाठी नवख्यांना संधी
पंचायत समितीच्या 14 गणांपैकी 7 गण राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तर शिवसेना 1, मनसे 1 व भाजप 5 असे गणित मागील पंचवार्षिक निवडणूकीत होते. जि.प. गटात 7 पैकी 4 गट भाजप च्या ताब्यात तर 3 गट राष्ट्रवादीच्या ताब्यात होते. चाळीसगाव विधानसभेची निवडणूक झालेनंतर आमदार म्हणून उन्मेश पाटील निवडून आलेत. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वात तालुक्यात बर्यापैकी भाजपने सत्ता परिवर्तन केले. भाजपला ग्रामपंचायत निवडणूकीत तसेच विकासोच्या निवडणूकीत चांगले यश मिळाल्यानंतर कृउबा व नगरपालिकेवर कब्जा मिळविला. या निवडणूकांमध्ये भाजपच्या वतीने बर्यापैकी नव्या चेहरर्यांना संधी दिल्याने भाजपला यश मिळाले आहे. आमदार उन्मेश पाटील यांनी नव्या चेहरर्यांना संधी देऊन नगरपालिकेत कधी नव्हे एवढे बहुमत मिळवत तब्बल नगराध्यक्ष पदासह 14 जागांवर वर्चस्व राखले. त्या पाठोपाठ शहर विकास आघाडीने 17 जागांवर आपले वर्चस्व सिध्द केले असले तरी सत्ता मात्र त्यांना राखता आली नाही. महत्वाचे पद म्हणजे नगराध्यक्षपद हे भाजपच्या पारड्यात पडल्याने व दोन अपक्ष आणि दोन शिवसेनेचे नगरसेवक भाजपला जाऊन मिळाल्याने आमदारांच्या नेतृत्वात भाजपला सत्ता राखता आली. त्यामुळे आमदारांचे राजकीय वजन वाढले आहे. तसाच काहीसा प्रकार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत समोर आला असून भाजपच्या जुन्या पदाधिकारी व विद्यमान जि.प.,पं.स. सदस्यांना डावलून भाजपने अनेक गट आणि गणांमध्ये नविन चेहर्यांना संधी दिली आहे. भाजपची ही खेळी नगरपालिकेच्या निवडणूकीप्रमाणे सफल होते का? याकडे जिल्हा व तालुक्याचे लक्ष लागून आहे.
निवडणुकीत आजी माजी पदाधिकार्यांची नाराजी
माजी आमदार राजीव देशमुख यांची आमदारकी गेली असली तरी त्यांनी राजकारणाला नव्याने कलाटणी देऊन जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकपद त्यांच्या ताब्यात घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत देखील त्यांनी काही ठिकाणी सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. नगरपालिकेच्या निवडणूकीत माजी आमदार राजीव देशमुख यांच्या लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या वतीने थोड्याफार प्रमाणात नव्या चेहर्यांना संधी देण्यात आली होती. मात्र त्यांच्या पदरात तराजू काट्यासारख्या सम समान म्हणजेच 34 पैकी 17 जागा पडल्याने भाजपा नगरपालिकेत काठावर पास झाल्यासारखे दिसत आहे. भाजपला टेकू म्हणून 2 अपक्ष आणि सेनेच्या 2 नगरसेवकांचा आधार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत भाजपने 7 गट व 14 गटांमध्ये त्यांचे उमेदवार अगोदरच जाहीर केले होते. त्यामुळे भाजप नविन खेळी खेळणार असे काही घडले नाही. भाजपच्या गोतावळ्यात नवनविन चेहरे सामील झाले. त्यामुळे त्यांनी वाघळी पातोंडा गटात पोपट तात्या भोळे यांना वगळता गटात फारसे जुने चेहरे टाकले नाहीत. त्याचप्रमाणे 14 गणांमध्ये देखील हाच फंडा वापरला आहे. जिल्हा परिषदेच्या जि.प. गटांमध्ये जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती राजेंद्र राठोड, जि.प.सदस्या विमलबाई शेषराव पाटील व महीला बालकल्याण सभापती दर्शना घोडे यांना जि.प.ची उमेदवारी दिली नसून त्यापैकी प्रभाकर सुधाकर जाधव यांना कडमळू गणामध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. टाकळी प्र.चा.-करगाव गटातील विद्यमान सदस्या विमलबाई पाटील यांच्या ऐवजी त्या गटात राष्ट्रवादीकडून आयात केलेले भाऊसाहेब खंडू जाधव यांच्या पत्नी मंगलबाई जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गणात ही तशीच परिस्थिती असून याठिकाणी देखील अनेकांना उमेदवारी दिली नाही. त्याठिकाणी अनेक नविन चेहर्यांना संधी देण्यात आली आहे.
कृउबाचे विद्यमान सभापती तसेच भाजपचे जुने जानकार नेते रविंद्र चुडामण पाटील यांना उमेदवारी दिली नसल्याने त्यांनी सायगाव – उंबरखेड गटामध्ये अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक लढणार असल्याने या गटात चुरस निर्माण झाली आहे. भाजपच्या काही विद्यमान सदस्य व जुन्या पदाधिकार्यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांचे अर्ज माघारी घेतले आहेत.
उमेदवारीचा अर्ज मागे घेतल्याने पक्षात गोतावळा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील थोड्या प्रमाणात अशा पध्दतीनेच उमेदवारी देण्यात आल्या आहेत. विद्यमान जि.प.सदस्या मंगला किशोेर पाटील यांच्या देवळी – तळेगाव गटात अतुल देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गट आणि गणामध्ये आरक्षण बदल्याने विद्यमान सदस्यांना संधी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी नव्या पध्दतीने पक्षाचे अधिकृत फार्म वर 2-2 उमेदवार दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. छाननी अंती देखील सर्वच्या सर्व उमेदवार पात्र असल्याने उमेदवारी अर्ज मागे घ्यावे कुणाचे हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेत्तृत्वात सामोपचाराने काही उमेदवारांनी आपले उमेदवाारी अर्ज मागे घेतल्याने त्यांचे देखील सर्वच्या सर्व उमेदवार रिंंगणात आहेत. या निवडणूकीत शिवसेना देखील मागे नसल्याचे शिवसेनेने दाखवून दिले असून त्यांनी एक गण वगळता सर्वच्या सर्व उमेदवार दिले होते. मात्र माघारीच्या दिवशी काही उमेदवारांनी माघार घेतल्याने काही गट आणि गणांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचा फटका कुणाला बसतो, हे मतदानानंतर समजणार आहे.
गट व गणाचे सदस्यत्व कोणाला लाभणार ?
आमदार उन्मेश पाटील यांच्या नव्या पध्दतीच्या उमेदवारी वाटपचा फायदा भाजपला बर्यापैकीपैकी झाला असला तरी त्यांच्या या खेळीमुळे भाजपातील जुने जानकार व निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसत आहे. त्याचा प्रत्यय म्हणून मागील आठवड्यात निवडणूकीत डावलले गेलेले व नाराज पदाधिकारी कार्यकत्यांची बैठक संपन्न झाली. त्यात नाराजीचा सुर उमटला असून ही नाराज मंडळी येणार्या निवडणूकीत भाजपापासून दुरावते का? हा सवाल निर्माण झाला आहे. ऐकीकडे यश मिळत असतांना निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाल्याने या निवडणूकीत भाजपला नुकसान होते का? यावर तालुकाभरात चर्चा सुरू आहे. हा भाजपासाठी चिंतेचा विषय असल्याचे बोलले जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर भाजप मध्ये पडलेली ही दुफळी भाजपला फायद्याची ठरते की तोट्याची हे येणार्या मतदानानंतर कळेल. याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणात देखील पडला कि काय ? म्हणून भाजपाच्या जाहीरनाम्या मधून आमदार उन्मेश पाटील यांचा फोटो वगळल्याने जिल्हाभरासह तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
-मुराद पटेल
9850121415