चाळीसगाव तालुक्यात महाअवयवदान अभियान

0

चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यात 29 व 30 ऑगस्ट 2017 रोजी तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे व आयुर्वेदीक दवाखान्याचे सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी महाअवयव दान अभियान राबवून मंत्री महोदय यांच्या आवहनाचे वाचन करुन अवयव दानाच्या प्रतिज्ञाचे वाचन करुन अवयवदानाचा प्रचार, प्रसार करुन तसा ठराव घ्यावा, असे आदेश जिल्हा आरोग्य विभागातर्फे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे. शासनाच्या वतीने मंगळवार 29 व बुधवार 30 ऑगस्ट 2017 रोजी महाअवयव दान अभियान राबविण्यात येणार आहे, या अभियानात चाळीसगाव तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत सर्व 108 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करुन मुख्यालयाच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेवक, सेविकांनी गावांमध्ये अवयव दानाबाबत माहिती व मंत्री महोदय यांनी केलेले आवाहन वाचन व अवयवदानाच्या प्रतिज्ञेचे वाचन करुन प्रचार व प्रसार करण्याबाबत ठराव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालय, माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये सदर माहिती ग्रामस्थांना वाचुन दाखवावी अवयव दानाचे वाचन करुन प्रतिज्ञेचे वाचन करावे व अवयव दानाचा प्रचार प्रसार करुन ठराव घेण्याचे म्हटले आहे.

अवयवदानाकरीता पुढाकार घेण्याचे आवाहन
त्याचप्रमाणे 30 ऑगस्ट 2017 रोजी ग्रामपातळीवर सर्व गावांमध्ये रांगोळ्या काढुन रांगोळी स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी पं.स.सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक – सेविका यांची समिती नेमुन पहिल्या तीन रांगोळ्यांना पारितोषिक द्यावे व त्यासाठी लागणारे अनुदान ग्राम आरोग्य समितीच्या अनुदानातुन घेवुन वरील सर्व आराखडा तयार करुन 27 ऑगस्ट 2017 पर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जि.प.जळगाव यांच्याकडे तातडीने सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. जनतेने अवयव दानाबाबत माहिती घेवून अवयव दानाकरीता स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांनी केले आहे.