बिल भरण्याचे ग्राहकांना आवाहन
चाळीसगाव – विज वितरण कंपनीने विज ग्राहकांना विज बिल वाढवले असले तरी चाळीसगाव तालुक्यात विज वितरण कंपनीचे सर्वच ग्राहकांकडे जुलै २०१८ पर्यंत १०० रुपयांच्या वर थकबाकी मध्ये तब्बल २५ कोटी ५० लाख रुपये थकबाकी असुन ही थकबाकी विज ग्राहकांनी भरावी असे आवाहन विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे. चाळीसगाव तालुक्यात घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, ग्रामीण भागातील पथदीवे व सार्वजनीक ग्रामीण पाणी पुरवठा योजना यांना विजेचे कनेक्शन देण्यात आले आहेत त्यात ३४ हजार ५१२ घरगुती ग्राहकांकडे तब्बल ६ कोटी ८ लाख रुपये थकबाकी आहे तर वाणिज्य साठी दिलेल्या कनेक्शन पैकी २५३१ ग्राहकांकडे १ कोटी ९२ लाख रुपये, ३२६ औद्योगिक ग्राहकांकडे १६ लाख रुपये थकबाकी आहे. शिवाय ग्रामीण भागातील रोडवर असलेल्या पथदिवे यांची २६१ कनेक्शन मधील १० कोटी ८७ लाख व १९१ सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ग्रामीण भागात असलेल्या कनेक्शन यांच्याकडे ६ कोटी ४७ लाख असे एकूण तब्बल २५ कोटी ५० लाख रुपयांची विज बिलांची थकबाकी १०० रुपयांच्यावर विज बिल असलेल्या वरील ग्राहकांकडे असल्याची माहिती चाळीसगाव विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री सोनवणे यांनी दैनिक जनशक्तीला दिली आहे.
तसेच या बिलांची वसुलीसाठी शहर व ग्रामीण भागासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांना वसुलीसाठी विज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करत ज्या ग्राहकांना विज बिल उशीरा येत असेल अथवा बिल मिळत नसेल अशा ग्राहकांनी महावितरणच्या वेबसाईटवर त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करुन घ्यावा. मोबाईल अपडेट झाल्यास आपल्या मिटरवर किती युनिट झाले, बिलाची माहिती मिळुन अथवा काही कारणास्तव विज केव्हा बंद राहील याची माहिती ग्राहकाला मोबाईलवर मिळते अशी माहिती देखील श्री सोनवणे यांनी दिली आहे.