चाळीसगाव । चाळीसगाव नगरपरिषदेचा सन 2017-18 चा जवळपास 130 कोटी रूपयांचा असलेल्या विविध तरतूदींचा अर्थसंकल्प मंगळवार 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी पालिका सभागृहात सादर केला. यावेळी विरोधी पक्षाने वादळी चर्चा करून यामध्ये अनेक विषयांना आक्षेप घेतल्याने काहीकाळ सभागृहात तणावाचे वातावरण होते. मात्र सादर केलेल्या अर्थसंकल्प तणावाचे वातावरण असल्यामुळे मंजूर झालेला नाही. याप्रसंगी सभागृहात नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपाध्यक्षा आशाबाई चव्हाण, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, कार्यालय अधिक्षक हिरामन खरात, सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी तरतूदीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केल्यानंतर अर्थसंकल्पाच्या प्रास्तावनेत चालू अर्थसंकल्पात मुख्यत: करून नागरिकांच्या मुलभूत गरजांसाठी प्रामुख्याने पाणीपुरवठा, जलनि:स्सारण, दलितवस्ती, गरीबांसाठी सुविधा आदी बाबींवर प्राधान्याने तरतूद करण्यात आली असून स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत वैयक्तीक शौचालय कार्यक्रमाकरीता शासन स्तरावरून 1 कोटी रूपये प्राप्त झालेले असून आज पावेतो 1308 वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. उर्वरीत लाभार्थ्यांच्या अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून 900 लाभार्थ्यांना दुसर्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.
घनकचरा व्यवस्थापनासाठी 50 टक्के निधीची तरतूद
केंद्र शासन सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना बंद करून त्याऐवजी राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत समाजातील वंचित विविध घटकांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करण्यात येणार असल्याची या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. मागासवर्गीयांसाठी आवश्यक राखीव निधीची तरतूद, महीला व बालकल्याण आणि अपंगांसाठी आवश्यक तरतूद, शहरातील पथदिव्यांना एलएडी बसविणे. सन 2016-17 च्या अर्थसंकल्पात जी कामे पुर्ण करावयाची आहेत योजनापुर्ण क्षमतेने राबवयाच्या असून त्यासाठी निधी कमी पडू नये म्हणून नव्याने विकसीत झालेल्या मालमत्तांवर कर आकारणी करण्यात आली असून मिळणार्या उत्पन्नातून विविध योजनातील तुट भरून काढणार आहे. त्यासाठी शंभर टक्के वसूलीचे उद्दीष्ट्ये ठेवण्यात आले आहे. शहाराचा वाढता विस्तार पाहून नविन भागातील नागरीकांना सेवा-सुविधा पुरविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. 14व्या वित्त आयोगांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी 50 टक्के निधीची तरतूद असून अहवाल शासनाकडे मंजूरीसाठी सादर केला आहे. उर्वरीत 50 टक्के निधी शहर विकास व सौंदर्यीकरणासाठी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत आजपावेतो 111 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. सन 17-18 या आर्थिक वर्षात भूमिगत गटार योजना नागद रोड लगत दुकान वेैंद्र, नवलेवाडी जवळ रेल्वे भुयारी मार्ग, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प न.पा.च्या मालकीच्या खुला जागांचा विकास आदी विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे.
नगरपरिषदेत अनेक मुद्यांवर हा अर्थसंकल्प गाजला
यावेळी माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी अनेक बाबींवर वादळी चर्चा केली. जनतेच्या सहभागातून अर्थसंकल्प तयार करणार असल्याच्या विषयावर बोलतांना यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणारे यांचेसह डॉक्टर, पत्रकार यांना देखील सहभागी करता आले असते. मात्र यात सभागृहाच्या सदस्यांनाच सहभागी केले नाही. हा सदस्यांचा अवमान असल्याचे नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी सांगितले, तर राजीव देशमुख यांनी पत्रकारांना देखील सहभागी घ्यायला हवे होते, दोन सह्यांचे पत्र निघाले त्यात उपाध्यक्षांना देखील डावलले त्याचप्रमाणे वर्कऑर्डर होऊन 6 महीन्यांच्यावर कालावधी झाला मात्र त्याकामांचे पेमेंट का झाले नाही. 14व्या वित्त आयोगामधील जुना निधी खर्च होत नसेल तर नविन निधी कसा मिळेल. यावर गटनेते राजेंद्र चौधरी यांनी आचारसंहीतेमुळे काम थांबले होते, असे सांगितल्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झालेत. यावर नगरसेवक आण्णा कोळी यांनी आम्ही अध्यक्ष व मुख्याधिकार्यांना प्रश्न विचारल्यावर गटनेते राजेंद्र चौधरी उत्तरे देतात यावर मुख्याधिकारी उत्तरे का देत नाहीत असा सवाल उपस्थित केला. त्याचप्रमाणे राजीवदादा देशमुख यांनी जी कामे चालू नाहीत याचे उत्तरे देखील मुख्याधिकार्यांनी द्यावीत. 31 जानेवारीच्या आत बजेट मंजूर झाले पाहीजे. आचारसंहीतेचे कारण देऊन कामे झाली नाहीत हे उत्तर देणे बरोबर नाही असे देखील त्यांनी सांगितले. याबाबत अधिक आक्रमक होत वैशिष्ट्यपुर्ण निधी रस्ता अनुदान संदर्भात माहीती द्या आपण खर्च करत नसाल तर बजेट चा उपयोग काय ? 1 कोटी 56 लाख रूपयांपैकी फक्त 39 लाख रूपयांची कामे झालीत यावर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. थर्डपार्टीकडून लेखापरिक्षण का थांबले यावर उत्तरे देतांना आम्ही शासकीय महाविद्यालयाशी संपर्क साधला होता, असे सांगताच तुम्ही केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रत द्या अशी मागणी राजीव देशमुख यांनी केली. अनेक मुद्यांवर हा अर्थसंकल्प गाजला.
तणावाच्या वातावरणात तू-तू, मै-मै
सुरूवातीला गटनेते राजेंद्र चौधरी हे स्टेज वर बसलेले असतांना विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेत आपण सभागृहात येऊन बसा असे सांगितल्या वर ते उठले नाहीत म्हणून गटनेते राजीवदादा देशमुख आक्रमक झाल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन तू – तू मै- मै झाल्यानंतर अखेर राजेंद्र चौधरी हे सभागृहातील खुर्चीवर बसल्यानंतर हा वाद निवळला. यावेळी महीला सदस्यांनी देखील प्रश्नांचा भडीमार केला. वीज, महीलां शौचालयांची बिकट अवस्था आदी प्रश्न उपस्थित केले. एकुणच अर्थसंकल्पीय चर्चा वादळी झाली. यावेळी नगरसेविका सायली रोशन जाधव यांनी रस्त्यांचे कामे होत नाहीत, रोजंदारीवरील मजुरांना पैसे दिले नाहीत अशी चर्चा सुरू असतांना नगरपालिकेचे कर्मचारी पुर्ण आयुष्य न.पा. ची व जनतेची सेवेसाठी खर्ची केले असतांना त्यांच्या हक्काचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे का देण्यात आले नाहीत? अंदाजे 2 कोटी 70 लाख रूपये कसे थांबलेत असे बोलून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. त्यांना 10 वर्षापासून वंचित का ठेवण्यात आले. असा सवाल उपस्थित करून आम्ही तर त्यांना त्यांचा हक्काचा पैसा देणारच आहोत. मात्र त्यांच्यावर अन्याय का? असे देखील त्यांनी यावेळी बोलून दाखविले.