चाळीसगाव (सुर्यकांत कदम) – चाळीसगाव नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत दिग्गजांना फटका बसला तर काही नवखे उमेदवार निवडून आले आहेत. गेल्या 45 वर्षाची सत्ता देशमुख घराण्याला राखता आली नसली तरी सभागृहात बहुमतासाठी लागणारे पारडे मात्र काहीसे त्यांच्या बाजूने झुकण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपाने प्रतिष्ठेची केेलेल्या या निवडणुकीत अनपेक्षीत यश मिळवले असून नगराध्यक्षपदासह तब्बल 13 नगरसेवक निवडून आणून चाळीसगाव वासियांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. असे असले तरी त्यांना बहुमतासाठी अजून जास्त संख्येची गरज असल्याने त्या दिशेने त्यांची जुळवाजुळव सुरू असल्याचे दिसत आहे. नगरपरिषद निवडणुकीत पक्षीय बालाबल पाहिल्यास लोकनियुक्त अध्यक्ष भाजपाचे आहे. त्यासोबत त्यांचे 13 नगरसेवक निवडून आले आहेत. दुसरीकडे लोकनेते अनिल देशमुख शहर विकास आघाडीचे 17 नगरसेवक निवडून आले आहेत.
शिवसेना व अपक्ष यांचे प्रत्येकी दोन जागांवर बाजी
शिवसेनेचे 2 तर दोन जागेवर अपक्षांनी बाजी मारली आहे. नगरपालिकेत बहुमत सिद्ध करण्यासाठी तुलनात्मक विचार केल्यास एका पक्षाकडे अथवा आघाडीकडे किमान 18 संख्या असली पाहिजे, मात्र ही संख्या अद्यापतरी कुणाकडे दिसत नाही. आघाडीकडे 17 असल्याने त्यांना देखील सभागृहात बहुमतासाठी आणखी संख्येची गरज आहे. तर भाजपाकडे 1 नगराध्यक्ष व 13 नगरसेवक अशी 14 संख्या आहे. त्यामुळे त्यांना आघाडीपेक्षा जास्त संख्या आवश्यक आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद भाजपकडे असून देखील आघाडीला बहुमताचे पारडे जड करण्यासाठी किमान 1 नगरसेवकाची गरज असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र ज्यांनी बहुमत सिद्ध केले त्यांना 1 स्विकृत नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. या बहुमतासाठी सर्वांच्या नजरा शिवसेनेचे 2 तर अपक्ष 2 यांच्याकडे आहेत. राष्ट्रीय पातळीवर युती करुन सेना व भाजपने सत्ता मिळवली असली तरी त्यांची नेहमीची तु-तु मैं-मैं हे राज्यासाठी नवीन नाही. एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. म्हणजेच ‘तुझ माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ अशी स्थिती आहे. या नगरपालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर भाजप व शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार देवून निवडणूक लढविली आहे. त्यामुळे चाळीसगाव नगरपरिषदेत शिवसेना बहुमतासाठी भाजपला मदत करील का? हे मात्र वेळच सांगू शकतो.
तडजोड केल्यास भाजप-सेना एकत्र येण्याची चर्चा
तसेच पातळीवरुन व्हिप निघाल्यास अथवा स्थानिक पातळीवर स्थानिक नेत्यांनी तडजोड केल्यास भाजप व सेना एकत्र येते का याची देखील चर्चा होत आहे. तसेच चाळीसगाव नगरपरिषदेत दोन महिला अपक्षांनी बाजी मारली आहे. त्यात बाजार समितीचे माजी सभापती रमेश चव्हाण यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका आशाबाई चव्हाण या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर भिमाचा किल्ला जिमखान्याचे अध्यक्ष रोशन जाधव यांच्या पत्नी सायली रोशन जाधव या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. या दोन अपक्ष उमदेवारांवर बहुमताची धुरा असल्याने आघाडी व भाजपचे नेते त्यांचे संपर्कात आहेत. ऐनवेळी हे उमेदवार काय निर्णय घेतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीची सत्ता 26 डिसेंबरपर्यंत असल्याने या घडामोडींकडे 26 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अद्याप बहुमत सिद्ध करण्यासाठी तारीख जाहीर झाली नसल्याने हा कार्यक्रम 26 तारखेनंतर केव्हावी लागण्याची शक्यता आहे.