समितीच्या 5 सभापतीपदी पैकी शविआला 4 तर भाजपाला 1 जागा
चाळीसगाव । चाळीसगाव नगरपरिषद लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या चार नगरसेवकांची समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यात शिक्षण सभापतीपदी सुर्यकांत तुकाराम ठाकूर, पाणीपुरवठा सभापतीपदी दिपक उत्तमराव पाटील, महिला बालकल्याण सभापतीपदी रंजना यशवंत सोनवणे तर आरोग्य समिती सभापतीपदी शंकर रामा पोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैलास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. यात शिक्षण समितीसाठी भाजपाकडून संजय रतनसिंग राजपूत विरूद्ध शविआचे सुर्यकांत तुकाराम ठाकूर, पाणी पुरवठा समितीसाठी शिवसेनेचे शामलाल वामनराव कुमावत विरूद्ध शविआचे दिपक उत्तमराव पाटील, महिला बालकल्याण सभापतीपदासाठी शिवसेनेचे विजया प्रकाश पवार विरूद्ध शविआचे रंजना यशवंत सोनवणे, आरोग्य समिती सभापतीपदासाठी भाजपाचे वैशाली सोमसिंग राजपूर यांच्या विरूद्ध शंकर रामा पोळ तर बांधकाम समितीसाठी भाजपाचे चंद्रकांत तायडे आणि शविआचे शेखर देशमुख यांनी उमेदवारीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
भाजपा व शिवसेनेचे उमेवारी अर्ज ठरले अवैध
त्यानंतर अर्ज छाननी नंतर संजय राजपूत, शामलाल कुमावत, विजया पवार आणि वैशाली राजपूर यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने यात शिक्षण सभापतीपदी सुर्यकांत तुकाराम ठाकूर, पाणीपुरवठा सभापतीपदी दिपक उत्तमराव पाटील, महिला बालकल्याण सभापतीपदी रंजना यशवंत सोनवणे तर आरोग्य समिती सभापतीपदी शंकर रामा पोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर शविआचे शेखर देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बांधकाम समिती सभापदी भाजपाचे चंद्रकांत तायडे यांची निवड करण्यात आले.