चाळीसगाव पं. स. तत्कालीन वरिष्ठ सहाय्यकास लाचप्रकरणात 4 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

0

जिल्हा न्यायालयाचा निकाल ; पेन्शन वर्ग करण्याच्या मोबदल्यात घेतली होती 1 हजाराची लाच

जळगाव : सेवानिवृत्तीची पेन्शन वर्ग करण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच लाच स्विकारणार्‍या चाळीसगाव पंचायत समितीचा तत्कालीन वरिष्ठ सहायक शांताराम गोविंदा निकम याला न्यायालयाने मंगळवारी 4 वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी हा निकाल दिला.

चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील पंढरीनाथ त्र्यंबक भामरे हे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक होते. त्यांचा 16 जून 2015 रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मिळणारी पेन्शन त्यांच्या पत्नीच्या नावे वर्ग करण्यासाठी त्यांचा मुलगा सुनील भामरे यांनी चाळीसगाव पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक शांताराम निकम यांची भेट घेतली होती. ही पेन्शन आईच्या नावाने वर्ग करण्यासह बॅँकेकडे पत्रव्यवहार केल्याचा मोबादला म्हणून वरिष्ठ सहायक निकम यांनी एक हजार रुपयांची मागणी केली होती. भामरे यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 13 ऑगस्ट 2015 रोजी निकम यांना घाटे हॉस्पिटलच्या भिंतीजवळ एक हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले होते.

यांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात तक्रारदार सुनील भामरे, पंच चेतन सतीष जेधे, जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, तपासाधिकारी प्रभाकर निकम यांच्या साक्षी अत्यंत महत्वाच्या ठरल्या. अतिरिक्त सहायक सरकारी वकील भारती खडसे यांचा प्रभावी युक्तीवाद लक्षात घेता न्या.लाडेकर यांनी आरोपी निकम याला लाच मागणी केली म्हणून तीन वर्ष कारावास व एक हजार दंड तर लाच स्विकारली म्हणून 4 वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी सुनील सपकाळे व केसवॉच सुनील शिरसाठ यांनी सहकार्य केले.