आरोपी नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी;
खाक्या दाखविताच मोटारसायकली चोरल्याची दिली कबुली
चाळीसगाव शहर पोलीसात गुन्ह्याची नोंद
चाळीसगाव – भडगाव तालुक्यातील शिवणी येथील एकाची चोरीस गेलेली ३५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीस भिलकोट येथून ताब्यात घेतले असून त्याच्याजवळून तब्बल चोरी केलेल्या ११ मोटरसायकली काढून दिले. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील रोहन अशोक पिसाळ (वय-२६) रा.शिवानी ता. भडगाव यांची 35 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची मोटरसायकल (एमएच १९, बीवाय २५६०), २२ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळच्या दरम्यान चाळीसगाव शहरातील हॉस्पिटलच्या आवारात कोणीतरी अज्ञात चोरट्या दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी चाळीसगाव शहरपोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या पथकाने केली कारवाई
सदर गुन्ह्याचे तपासकामी अप्पर पोलीस अधीक्षक श्री.बच्छाव व उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड, नजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे-पाटील यांनी तपासाबाबत अधिक चौकशीसाठी पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक राजेश गोडवे, बाबुराव भोसले, संभाजी पाटील, विजय शिंदे, राहुल पाटील, नितीन पाटील, प्रेमसिंग राठोड, गोवर्धन बोरसे, गोपाल बेलदार, प्रवीण सपकाळे, तुकाराम चव्हाण, राहुल गुंजाळ, सुनील राजपूत यांनी कारवाई केली.
गुन्ह्याची दिली कबुली
पथक रवाना केल्यानंतर तपासकामी भिलकोट तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे जाऊन गुप्त माहितीनुसार आरोपीचा शोध घेऊन भिलकोट शिवारात सापळा रचून आरोपी प्रवीण रतन सोनवणे (वय-२४) रा. राजमाने ता. मालेगाव ह.मु. भिलकोट ता. मालेगाव जि. नाशिक याला मोटरसायकलीसह ताब्यात घेतले. त्याची अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबुल केलेल्या एकूण ११ मोटरसायकली झोडगे ता. मालेगाव येथील परिसरात ठेवलेले सर्व मोटरसायकल काढून दिल्या. आरोपीसह 11 मोटर सायकल पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.