चाळीसगाव पालिका सभेत खडाजंगी

0

62 कोटींची बहुचर्चित वाढीव पाणीपुरवठा योजना विषय तहकूब
नगर पालिकेचा झाला आखाडा जनता वार्‍यावर
चाळीसगांव – नगरपरिषदेची स्थायी समितीच्या सभा आज नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेतील सभागृहात सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती. यात विविध 59 विषयावर चर्चा करण्यात आली. त्यापैकी विषय क्रमांक 55 यांवर सत्ताधारी भाजप व अपक्षांसह विरोधी कै अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या सदस्यां मध्ये जोरदार चर्चा होऊन अखेर विषय 55 वरील चर्चा तहकूब ठेऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.

विषय क्रमांक पंचावन्न गाजला
आजच्या सभेत अपेक्षेप्रमाणे पंचावन्न क्रमांक या विषयांवर जोरदार खडाजंगी होईल अशी अपेक्षा होती यासाठी डळमळीत झालेले सत्ताधार्‍यांचे बहुमत मजबूत करण्याचा हालचाली सुरू असल्याचे चित्र शहरात दिसून येत होते तर कुठल्याही परिस्थितीत या विषयांवर मंजुरी देण्यात येणार नाही यासाठी विरोधकांनी तयारी केली असल्याचे स्पष्ट दिसून येत होते अखेर दुपारी तीन वाजता विषय क्रमांक 55 अभियंता पाणीपुरवठा यांचा रिपोर्ट महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत वाढीव चाळीसगाव पाणीपुरवठा योजना या कामाच्या प्राप्त निविदेवर सभेत चर्चा सुरू झाली. यावर आघाडीचे गटनेते राजीव देशमुख यांनी सविस्तर मत मांडत प्रशासनाला धारेवर धरले हा विषय न्यायालयाच्या अखत्यारीत आला असून त्याला मंजुरी देणे कायद्याचे उल्लंघन होईल त्याचे परिणाम मुख्याधिकारी यांच्यासह सर्वच सदस्यांना भोगावे लागतील यांवर मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी पालिकेची भूमिका मांडली. वेळोवेळी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच विषयांच्या मंजूरीसाठी स्थायी समितीचीसमोर हा विषय मंजुरीसाठी ठेवला आहे. यावर हा विषय जनतेच्या भल्यासाठी अतिशय महत्वाचा असून त्याला सर्वांनी मंजुरी द्यावी, अशी विनंती नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी केली. मात्र यावर दोन तासांपेक्षा अधिक वेळ चर्चा होऊन ही हा विषय तहकूब ठेवण्यात आला.

शहर विकास आघाडीचा विरोध कायम ?
विषय क्र. 55 डीपीआर मुद्यावरूनआजची स्थायी सभा गाजणार असल्याचे संकेत या अगोदर मिळाले होते. या अनुषंगाने आज दुपारी पालिका सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आघाडीचे नेते राजीव देशमुख यांनी महाराष्ट्र सुजल पाणी पुरवठा योजना या 62 कोटीच्या योजनेच्या डिपीआरला विरोध नोंदवला असून ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याचे बैठकीत सांगितल्याने अखेर या विषयाला आघाडीचा विरोध असल्याचा पुनरुच्चार केला . महाराष्ट्र सुजल पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता तसेच शासनाच्या शासकीय परिपत्रकानुसार अटी, शर्तींचे पालन न करता झालेले उल्लंघन निविदा उघडण्यासाठी असलेली वेळ, मर्यादा ओलांडणे अपेक्षेपेक्षा अधिक रकमेचे निविदा काढणे तसेच या विरोधात कै.अनिलदादा शहर विकास आघाडीने औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली. व ती न्यायप्रविष्ठ असल्याचे या वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजूरी देणे म्हणजे ही बाब न्याय प्रविष्ठ असतांना सत्ताधार्यांसह विरोधकांना आरोपींच्या पिंजर्यात उभे करण्यासारखे असल्याचे ठाम मत गटनेते राजीव देशमुख यांनी स्थायी समितीच्या बैठकीत निदर्शनात आणून दिले.

यांची होती उपस्थिती
बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण यांच्यासह पालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर उपस्थित होते. स्थायी समितीच्या सभेत गटनेते राजेंद्र चौधरी, शहर विकास आघाडीचे उपगटनेते सुरेश स्वार, आरोग्य सभापती वैशाली राजपूत, बांधकाम सभापती चंद्रकांत तायडे, महिला बालकल्याण सभापती रंजनाताई सोनवणे, पाणी पुरवठा सभापती दिपक पाटील, शिक्षण सभापती सुर्यकांत ठाकूर, पालिका अभियंता व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेली सभा सायंकाळी पाच वाजता संपली. यावेळी पालिकेचे मुख्य अभियंता राजेंद्र पाटील, शहर अभियंता विजय पाटील, डिगंबर वाघ, पाणी पुरवठा अभियंता अमोल चौधरी, गुलाबराव खरात, दीपक देशमुख, आरोग्य निरीक्षक तुषार नकवाल, दिलीप चौधरी, यांच्या सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

नागरिकांच्या सोयीच्या अत्यावश्यक विषयांना मंजूरी
विषय क्र. 55 व्यतीरिक्त सर्व विषयांना मंजूरी देण्यात आली. यात आरोग्य, पाणीपुरवठा, मुरूम तसे घनकचरा यासह विविध जनतेच्या हिताचे विषयांना मंजूरी देण्यात आली. तसेच ट्रि गार्ड आणि मुरूम ठेका हा पावसाळ्याच्या अगोदरच देण्यात आला पाहीजे होता. अखेर त्याला विषयाला ही आज मंजुरी देण्यात आली स्थायी सभेत काय कामकाज झाले व कुठल्या विषयांना मंजुरी मिळाली याबाबत शहरातील चौकाचौकात चर्चा दिसून आली तर पालिकेत माजी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील ,नितीन पाटील , विजया भिकन पवार, विजया प्रकाश पवार ,चिरगोद्दीन शेख, अरुण आहिरे बाळासाहेब मोरे जनसेवक डॉ. प्रमोद सोनवणे, भैय्यासाहेब महाजन, अमित सुराणा, गौरव पुरकर, कालुदादा शिंदे, गौरव चौधरी यांची यावेळी धावपळ दिसून आली.