चाळीसगाव – शहरात नव्याने टाकण्यात येणाऱ्या 68 कोटी रुपयांची पाइपलाइन कामाला आज धुळे रोड परिसरातील शिवदर्शन कॉलनी येथील अठरा फुटी रस्त्याजवळ नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्याहस्ते प्रत्यक्ष कामाला शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी पालिका मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सत्ताधारी पक्षाचे गटनेते तथा शिक्षण सभापती संजय पाटील, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पाणी पुरवठा सभापती चिराग शेख, बांधकाम सभापती बापूसाहेब आहिरे, महिला व बाल कल्याण सभापती विजया प्रकाश पवार , ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, शहर विकास आघाडीचे सुरेश स्वार, अलका गवळी, चंद्रकांत तायडे, पालिका पाणी पुरवठा अभियंता संजय आहिरे, रा.वी.संचालक विश्वास चव्हाण, प्रकाश पवार,लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे संजय कुमावत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सहाय्यक अभियंता ए.एन. गोसावी, प्रोजेक्ट इंजिनियर एस.डी. पाटील, दीपक देशमुख, कैलास आगोणे, अमोल आहिरे, वाल्मीक सोनवणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात मिळेल सारख्या दाबाने पाणी !
चाळीसगाव शहराचा झपाट्याने विकास होतो आहे. धुळे रोड, मालेगाव रोड, भडगाव रोड, करगाव रोड, खरजई रोड, टाकळी प्र.चा. लागून असलेले नवीन भाग, नागद रोड, घाट रोड, पाटणादेवी रोड , हिरापुर रोड कोदगाव रोड, इच्छा देवी रोड यासह शहराच्या नवीन व वाढत्या वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाणी पोहचावे यासाठी पालिकेने कंबर कसली होती. आमदार उन्मेष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने ही योजना शहरवासीयांच्या समस्येवर उपाय म्हणून ही योजना प्रत्यक्षात उतरविली. एवढेच नव्हे तर आज नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी या कामाचा शुभारंभ केल्याने लवकरच शहराच्या कान्या कोपऱ्यात समान दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे या योजनेचे काम सुरू व्हावे व आमच्या अडचणी दूर व्हाव्या ही शहरवासीयांची उत्सुकता आज संपली आहे. शिवदर्शन व हिरापुर रोड वरील रुद्र हनुमान मंदिरा जवळ अश्या दोन ठिकाणी या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.