चाळीसगाव पालिकेतील “त्या” कायम कर्मचाऱ्यांच्या जल्लोष !

0

१४४६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय
चाळीसगाव – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २० मार्च १९९३ ते २७ मार्च २००० मधील नियुक्त व कार्यरत १४४६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आल्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यात कायम झालेले सर्वाधिक १८९ कर्मचारी चाळीसगाव नगरपरिषदेचे असून ही वार्ता पोहचल्यावर सर्व कर्मचाऱ्यांनी पालिका आवारात फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोस्तव साजरा केला. यावेळी आनंदित झालेले कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आमदार उन्मेष पाटील यांच्यासह शासनाच्या आभाराच्या घोषणाबाजी ने परिसर दणाणून सोडला.

पालिका आवारात फटाके फोडून आनंदोत्सव व्यक्त
यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, सत्ताधारी पक्षाचे गटनेते संजय पाटील, कर्मचारी संयुक्त कृती समितीचे उत्तर महाराष्ट्र नेते देविदास बोंदर्डे, तालुक्याचे कामगार नेते डी.एस. मराठे, संघटनेचे अध्यक्ष तथा अभियंता राजेन्द्र पाटील, नगरसेवक नितीन पाटील, आनंद खरात, बाळासाहेब मोरे, सोमसिंग राजपुत, प्रभाकर चौधरी, चंद्रकांत तायडे, मानसिंग राजपुत, चिरागोद्दिन शेख, नगरसेविका विजयाताई पवार, विश्वास चव्हाण यांच्यासह कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहत होते तर कर्मचारी एकमेकांना आनंदाने मिठी मारत होते. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आमदार उन्मेष पाटील म्हणाले की, राज्यात आज कायम झालेल्या नगरपरिषदेचे कर्मचाऱ्यांची एकुण संख्येत चाळीसगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे,माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची ही पालिकेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मचारी बांधवांना अनोखी भेट असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.