चाळीसगाव पालीकेवर महिलांचा हंडामोर्चा

0

मुख्याधिकारी मानोरकरांना घेराव

चाळीसगाव – शहरातील प्रभाग क्रमांक १७ जहागिरदारवाडी येथील नागरीकांना सुरळीत पाणीपुरवठा करून या भागातील नाल्याची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी या मागणीसाठी चाळीसगाव नगरपालीकेवर येथील महिलांनी हंडामोर्चा काढुन मुख्याधिकार्‍यांच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी नगरसेवक बंटी ठाकुर, माजी नगरसेवक प्रदीप राजपूत यांनी नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्याशी चर्चा केली.
शहरातील जहागिरदारवाडी नदीकिनारा दर्गामागील भागात गेल्या वर्षभरापासुन सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. याभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असुन येथील नागरीकाना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईबाबत येथील नागरीकांनी पालिका प्रशासनाला वारंवार तोंडी व लेखी सुचना दिल्या आहेत. ऐन उन्हाळयात या परिसरात पाणीटंचाई भासत असुन महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वारंवार सुचना देवुनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने येथील महिलांनी नुकताच पालीकेवर हंडा मोर्चा काढुन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना घेराव घातला. यावेळी महिलांनी हंडे घेवुन थेट मुख्याधिकार्यांचे दालन गाठुन पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी विचारणा केली. यावेळी दालनात मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पाणीपुरवठा विभागाचे दिपक देशमुख, माजी नगरसेवक प्रदीप राजपुत, आरोग्य विभाग प्रमुख तुषार नकवाल, अतिक्रमण अधिकारी भूषण लाटे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. या परिसरात पालीकेचे अधिकारी व कर्मचारी भेट देवुन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाहणी करून येथील नागरीकांचा पाण्याचा व स्वच्छतेचा प्रश्‍न लवकरच सोडविण्यात येईल असे आश्‍वासन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिल्यानंतर महिलांनी पालीकेतुन माघार घेतली. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर दिपक महाले, हुसेन मुबारक, अनन बेग, अक्काबाई चौधरी, ईरशाद बी, जनाबाई पाटील, एजाज खान यांच्यासह नागरीकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

अस्वच्छेबाबत नागरीक संतप्त
जहागिरदारवाडी भागात असलेल्या शौचालयांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. याठिकाणी पाण्याचा अभाव असुन शौचालयांचे दरवाजे खिडक्यांची मोठया प्रमाणात तोडपोड झाली आहे. शौचालयांच्या देखरेखीसाठी येथील केअरटेकर हे शौचालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी नागरीकांनी केला. परिसरातील नाले व नदीपात्र हे घाणीचे तुडूंब भरले असुन डासांचा मोठा प्रादुर्भाव याठिकाणी असुन रोगांचे प्रमाण वाढले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

वर्षभरापासून पाठपुरावा
आठ महिन्यात सातत्याने पाठपुरावा करूनही वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली येथील नागरीकांना पाण्यासाठी वंचीत ठेवण्यात आले आहे. अशी आमची तक्रार असून यावर नागरीकांची मागणी मान्य करून सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी आदेश दिले असल्याची माहिती यावेळी नगरसेवक बंटी ठाकुर, नगरसेविका प्रदीप राजपूत, नगरसेविका सविताताई राजपूत यांनी दिली आहे.

लवकरच नवीन पाइपलाइन
जहागिरदारवाडी भागात असलेल्या पाणीपुरवठा व स्वच्छता या नागरीकांच्या मुलभुत प्रश्‍नाकडे पालीकाप्रशासन तात्काळ तोडगा काढून नागरीकांच्या या समस्या सोडविण्यात येतील. या भागाची तात्काळ पाहणी करून पाण्याचा प्रश्‍न तात्काळ सोडविण्यात येईल. या भागात नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच सर्वांना सारख्या दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होईल,अशी माहिती यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलताना दिली.