चाळीसगाव पोलीसांची राहणार आता करडी नजर

0

चाळीसगाव। दिवसेंदिवस शहराचा वाढत चाललेला विस्तार व वाहनांची वाढ त्यामुळे गुन्हा घडल्यावर गुन्हेगार वाहनांमधुन पसार होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत याला पायबंद बसावा म्हणुन चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी पाठपुरावा केल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून चाळीसगाव शहरातील महत्वाच्या 10 ठिकाणी एकुण 28 सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर झाले
असुन लवकरच ते बसवण्यात येतील, अशी माहिती गाडे पाटील यांनी दिली आहे.

शहरात एकुण 28 सीसीटिव्ही कॅमेरे बसणार: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून चाळीसगाव शहरात महत्वाच्या 10 ठिकाणी 28 कॅमेरे मंजूर करण्यात आले असुन लवकरच सिग्नल पॉईंट मनमाड चौकात 4 कॅमेरे तर धुळे-मालेगाव रोड कोतकर कॉलेज वाय पॉईंट 2, कॅप्टन कॉर्नर 2, करगाव रोड देवरे हॉस्पिटल चौफुली 2, भडगाव रोड पूर्णपात्रे शाळेसमोर शेजवळकर नगर 2, भडगाव रोड खरजई नाका 3, रांजणगाव दरवाजा अहिल्यादेवी होळकर चौक 3, घाटरोड हॉटेल सदानंद चौक 3, रेल्वे स्टेशन पोलीस चौकी जवळ 3, हिरापुर रोड नविन नाक्याजवळ 2 असे एकुण 28 सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत या कॅमेर्‍यामुळे रात्रीच्या सुमारास देखील 100 फुटांपर्यंत स्पष्ट दिसु शकते त्यामुळे आता कोणत्या रस्त्याने कोणते वाहन केव्हा व कुठे आले, कुठे गेले तसेच शहरातील घडामोडी पोलीसांना समजणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी दिली आहे.

तपासाला येणार गती
शहरात अनेक घटना घडत असतात. मात्र महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलीसांना आरोपींचा शोध घेणे कठीण जाते. यासाठी शहर पोलीस स्टेशनतर्फे मागील काळात सीसीटीव्ही कॅमेर्‍याची मागणी करण्यात आली होती. मात्र पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडेपाटील चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून त्यांनी जवळपास 2 महिन्यांपासून शहरातील विवीध भागांची पाहणी करुन शहरात महत्वाच्या 15 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍याची गरज असल्याचा अहवाल वरीष्ठाना पाठविण्यात आले.