चाळीसगाव बसस्थानकाचा चेहरा मोहरा बदलला

0

चाळीसगाव (अर्जून परदेशी) । तालुक्यातील 139 गावाशी दैनंदिन संपर्क करणारी लालपरी, जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकाचे उत्पन्न असणारे बसस्थानक व 30 हजार प्रवाशांची वर्दळ असलेले चाळीसगाव बस्स्थनाकाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात असून एक कोटीचा निधी खर्चून संपूर्ण परिसरातील बसस्थानकाचे रूप पालटले आहे. दरम्यान काल रात्री आमदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितत शिवशाहीबस पुणे येथे रवाना झाली. त्यामुळे बसस्थानकाच्या वैभवात भर पडली आहे. चाळीसगाव तालूका हा औरंगाबाद नाशिक व धुळे, जळगाव या 4 जिल्ह्याचा सीमेवर असून औरंगाबादकडे व धुळेमार्गे नंदुरबार व गुजरात राज्यात जाण्यासाठी येथून मोठी बस वाहतूक होते. त्यातच भडगाव, पाचोरा, सोयगाव, कन्नड, नांदगाव, मनमाड, मालेगाव, धुळे, पारोळा या तालुक्यातील गावांना जाण्यासाठी चाळीसगाव बसस्थानकातून प्रवास करावा लागतो, असे असताना गेल्या वर्षभरापूर्वी या बसस्थानकातून पायी चालणे कठीण होते. आमदार उन्मेश पाटील व स्थानिक संघटना प्रतिनिधी यांनी या दुर्दशेबाबत महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने 1 कोटींचा निधी मिळाला. त्यातून बसस्थानकाचा नूतनीकरण सुरू करण्यात आले होते. गेल्या दहा महिन्यापासून सुरू असलेले हे काम अंतिम टप्प्यात असून हे बसस्थानक देखणे झाले आहे.

माजी परिवहन मंत्री डी.डी.चव्हाणच्या आठवणींना उजाळा
1970 च्या सुरुवातीस 5 एकर जागेत या बसस्थानकाचे काम झाले होते. त्यावेळी या कामाची खान्देशात चर्चा झाली होती. तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या बसस्थानकाच्या कामसाठी तत्कालीन महामंडळाचे सदस्य चाळीसगावचे के.डी.पाटील व परिवहन मंत्री डी डी चव्हाण यांनी केलेल्या भक्कम पाठ पुराव्यामुळे हे भव्य बसस्थानक झाले होते त्यानंतर मात्र किरकोळ डागडूजी वगळता मोठा निधी मंजूर करण्यात आला नाही पंचेचाळीस वर्ष्यानंतर आज या बसस्थानकाचा नववद लाख रुपयांचा खर्च केला जात आहे त्यातून हे बसस्थानक नवे रूप धारण केल्याने तत्कालीन परिवहन मंत्री डीडी चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा मिळाल्याची चर्चा या निमिताने जेष्ठ नागरिकांमध्ये होत आहे

शिवशाही बसला हिरवी झेंडी
बसस्थानक नूतनीकरण कामामुळे बसस्थानकाच्या लौकिकात भर पडणार असून प्रवासी वाहतूक व्यवस्था सुटसुटीत होणार आहे त्यातच नवीन शिवशाही दोन बसेस दाखल झाल्या आहेत.काल रात्री उशिरा या गाड्याना पुणे येथे रवाना करण्यात आले आमदार उन्मेष पाटील नगराध्यक्षा आशालता चव्हाण जिप शिक्षण सभापतीपोपट भोळे विभागीय वाहतूक अधीक्षक विजय धायडे, आगारप्रमुख संदीप निकम, यांच्या सह मान्यवर उपस्थित होते या बसेस मुळे विदयार्थी ,जेष्ठ नागरिक सर्वसामान्य प्रवाश्यांची व्यवस्था होणार असून नूतनीकरण काम सुरू असताना या दोन नवीन बसेस मुळे आगराचे उत्पन्न वाढणार आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य या निमिताने सफल होत आहे तसेच खाजगी वाहनाच्या तुलनेत जास्त आरामदायी बसेस सेवेसाठी सज्ज असल्याने प्रवाश्यांनी बसेस चा वापर करावा असे आवाहन यावेळी आगारप्रमुख संदीप निकम यांनी बोलून दाखविली.

नूतनीकरणासाठी आमदारांचा उपोषणाचा पवित्रा
बसस्थानकातुन ग्रामीण भागासह दररोज हजारो नागरिक चा प्रवास होतो, मात्र येथील दुरावस्थे मुळे कर्मचार्‍यांसह जनतेची नाराजी वाढत चालली होती. इतर विकास कामांचा धडाका सुरु असतांना बसस्टँड चे काय? असा प्रश्‍न मतदार संघात आमदार उन्मेश पाटील यांना विचारला जात होता. क्राँक्रिटीकरण कामासाठी परिवहन मंत्री याना 28 स्मरणपत्रे दिली, तरी देखील काम रेंगाळले. अखेर परिवहन मंत्र्यांना तेव्हाच्या अधिवेशनात उपोषणाची धमकी दिली होती. त्यामुळे 18 मे 2017 ला परिवहनमंत्र्यांनी कामाची वर्क ऑर्डर दिल्यानंतर काम मार्गी लागले होते.

वचनपूर्ती होत असल्याची भावना – आ.पाटील
बसस्थानकाच्या दुरावस्थेमुळे मी स्वतः हतबल होतो, प्रवाशी जनतेची या अडचणीतून सुटका व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेतली. त्यातून निधी मंजूर करून घेतला. यामुळे तालुक्यातील दळणवळणचा मोठा भार असलेले बसस्थानकाने नवे रूप धारण केले आहे. नवीन सोयी सुविधेचा पहिला टप्पा गाठला असून याचा सर्वच प्रवश्यासह कर्मचार्‍याबरोबर मला देखील आनंद आहे. यानिमिताने एक पाऊल पुढे टाकत वचन पुर्ती होत असल्याची भावना आमदार उन्मेष पाटील यांनी ’जनशक्ती‘ शी बोलताना व्यक्त केली आहे.

अशी झाली कामे
चाळीसगाव बसस्थानक व आगाराच्या एकूण 1 हेक्टर 53 आर क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाकडून प्रथमच मोठ्या प्रमाणात भरीव निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये मुख्य बसस्थानाकाच्या नुतनीकरणासाठी 53.39 लक्ष तर वाहनतळासह इतर कामांसाठी 35.69 लक्ष निधीचे वितरण करण्यात येणार आहे. बसस्थानकात 11 बसेससाठी फलाट, एक नियंत्रण कक्ष, एक बसस्थानक प्रमुख कक्ष, एक एटीएस रूम व एक पार्सल रुमचा समावेश करण्यात येणार आहे. बसस्थानकाच्या कामात बसस्थानकातील फलाटाची उंची वाढविणे, तळाला कोटासह आधुनिक पध्दतीचे फ्लोरींग बसविणे, ग्रॅनाईट बँचेस, ल्युमिनियम विंन्डोज, बसस्थानकास रंगरंगोटीसह संपुर्ण काँक्रिटीकरण, स्वतंत्र नियंत्रण कक्ष इती कामे मार्गी लागली आहेत आहे. तसेच पार्कींग एरियाचे काँक्रिटीकरणासह ड्रेनेज लाईनची स्वतंत्र व्यवस्थाही यातुन अंतिम टप्प्यात आहे.