चाळीसगाव । उमंग समाजशिल्पी महिला परिवार आणि उमंग सृष्टी स्कूलतर्फे पालकांसाठी आभिमान वाटावा अशी आपली मुले घडवू या कार्यक्रम शनिवार 8 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पालकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिली. आपल्या पाल्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी पालकांनी काय जबाबदारी पार पडली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमंग महिला मंडळाच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार उन्मेश पाटील यांनी मुल हीच खरी पालकांची संपत्ती असते. आपली मुले घडविण्यासाठी व त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी पालकांनी सदैव जागरूक राहिले पाहिजे. प्रत्येकाकडे पैसा, प्रतिष्ठा आहे परंतु आपल्या मुलांचे भविष्य घडविणे हे कार्य फार महत्वाचे आहे. विचारांची संपदा ज्याच्याजवळ आहे तेच खरे सुखी होय, असे मार्गदर्शन यावेळी उपस्थितांना केली.
आपल्या मुलांना प्रेमाने वागणूक देवून त्यांच्यातील जिज्ञासा वृत्तीने त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची योग्य उत्तरे दिली पाहिजे. मुलांशी खोटे बोलू नये. त्यांना मैत्रीपूर्ण वातावरणात योग्य वेळी योग्य ज्ञान दिले पाहिजे जेणेकरून त्यांची वैचारिक पातळी उंचावून विकास होईल. तसेच मार्गदर्शनात विविध उदाहरणे देवून पालकांना आपल्या मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे कशी द्यावी याची सविस्तर चर्चा केली. यावेळी पालकांनी देखील या चर्चासत्रात उत्स्फूर्त सहभाग घेवून आपल्या समस्याची सोडवणूक केली. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी आई-वडील यांनी त्यांना वेळ दिला पाहिजे. त्याच्याशी हितगुज करून मुलांना असलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मार्गदर्शक गिरीश कुलकर्णी यांचे पालकांना मार्गदर्शन
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक गिरीश कुलकर्णी यांनी पालकांना व्यवस्थित मार्गदर्शन केले. यावेळी पालकांच्या आपल्या मुलांविषयीच्या विविध समस्या जाणून त्यावरील उपाय देखील विविध दाखले देवून सोडविण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात पालकांशी संवाद साधतांना गिरीश कुलकर्णी यांनी प्रश्नउत्तरे यामार्फत पालकांशी संवाद साधला. आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपले अनुकरण आपले मुल करत असतात त्यामुळे पालकांनी देखील याबाबत काळजी घेतली पाहिजे.
पालकांचे होते दुर्लक्ष
पालक आपल्या दैनंदिन व्यवहारात व्यस्त असल्याने मुलांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे मुलांचे वर्तनात बदल होवून पालकांशी कमी संवाद ते साधतात त्यामुळे त्यांच्यात चिडचिड वाढते त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर होत असतो. प्रत्येक पालकांनी मुलांना वेळ द्यायलाच पाहिजे आजचे युग तंत्रज्ञानाचे युग असल्याने मुलांना मोबाईल, फेसबुक, व्हाटस अप यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक कामासाठी व्हावा व मुलांच्या ज्ञानात भर व्हावी यादृष्टीने पालकांनी लक्ष ठेवायला हवे असे मार्गदर्शकानी मत मांडले. कार्यक्रमच्या शेवटी सौ. संपदाताई पाटील यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.