चाळीसगाव – शहरातील सिग्नल चौकातील दुकानासमोरून चोरलेल्या मोटारसायकलीसह चोरट्यास शहर पोलीसांनी तपास करून काही तासातच अटक केली. हा भामटा ठाणे येथील असून त्यास मालेगाव येथून अटक केली. त्याच्याकडून दुचाकी चोरीच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. येथील सिग्नल चौकातील एका राष्ट्रीय विद्यालयाजवळील एका दुकानासमोर लावलेली कमलेश झुंबरलाल जैन यांच्या मालकीची (एम.एच.19 सीसी 0355) ही हिरो होंडा मोटारसायकल 24 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 6.45 वाजेच्या सुमारास चोरीस गेली होती. याप्रकरणी जैन यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपासासाठी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी नजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी उपनिरीक्षक राजेश घोळवे, डीबीचे हवालदार बापुराव भोसले, राहूल पाटील, गोवर्धन बोरसे, तुकाराम चव्हाण, गोपाल बेलदार, प्रविण सपकाळ यांचे पथक नेमले. या पथकाला गुप्त बातमीदाराकडून राहूल शंकर महाजन (21) रा. ठाणे पश्चिम यास साजवहळ ता. मालेगाव येथे जावून सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता वरील मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्यास शहर पोलीसांनी अटक करून चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठीडी सुनावण्यात आली. संशयीत आरोपीकडून अजून काही चोरीच्या मोटारसायकली हस्तगत होण्याची श्नयता आहे. पुढील तपास हवालदार बापुराव भोसले करीत आहेत.