चाळीसगाव येथे नगरसेवकाकडून डॉक्टरास मारहाण

0

चाळीसगाव । रुग्णांचे नातेवाईक, आत्पेष्ट यांच्याकडुन डॉक्टरांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढतेच असून मागील काही दिवसापूर्वी डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्यांच्या निषेधार्थ डॉक्टरांकडून संप पुकारण्यात आला होता ही घटना ताजी असतांनाच चाळीसगाव शहरातील नगरसेवक व इतर 1 जण बालाजी जनरल सर्जिकल हॉस्पिटल मध्ये शुक्रवारी 30 जून 2017 रोजी रात्री 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये जाऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधीत डॉक्टरांनी महिन्याभरापूर्वी महिलेवर उपचार केले होते. महिन्याभरापूर्वी झालेल्या उपचाराची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी मागितली ती सकाळी देतो असे डॉक्टराकडून सांगण्यात आले याचा राग येऊन नगरसेवकासह इतरांनी अरेरावी करत शिवीगाळ केली तसेच धमकी मारहाण केले. डॉक्टराने दिलेल्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला नगरसेवका सह एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संघटनेतर्फे निषेध
डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांवर हल्ला हा नेहमीचाच झाला आहे. चाळीसगावातील घटनेचा डॉक्टरांच्या आय.एम.ए.संघटनेने निषेध केला आहे. डॉ.राहुल पाटील यांना मारहाण करणार्‍या संंबंधीतांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर संघटनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांना निवेदन देण्यात आले.

सोशल मिडीयावर व्हीडीओ
हैदरअली याने डॉक्टरांना पकडून ठेवले व नगरसेवक चिरागोद्दीन यांनी चापटाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी डॉक्टर राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील दोघां विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र रसेडे करीत आहेत. मारहाण केल्याचा सीसीटीव्ही चित्रण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.