चाळीसगाव येथे पर्ल्स अ‍ॅग्रो टेक कार्पोरेशन एजंटचा प्रामाणिकपणा

0

चाळीसगाव । 1983 पासून गाजावाजा करून स्थापन झालेल्या पर्ल्स अ‍ॅग्रो टेक कॉर्पोरेशन इंडिया लि. या कंपनीने सर्व सामान्य जनतेच्या पॉलिसी काढून पैसे जमा करत 2014 साली ही कंपनी बंद करून त्यात अनेक गोरगरीब जनतेचे ठेवी रक्कम अडकली आहे. ही रक्कम कंपनी घेऊन गेल्याने त्यांची रक्कम पॉलिसी एजंट देत नाहीत. मात्र येथील पवारवाडीतील एजंटने चक्क घरातुन पॉलिसीधारकांना त्यांनी जमा केलेली रक्कम अदा केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. इतर एजंटांनी देखील गोरगरीबांचा पैसा परत करावा, असे आवाहन अतुल घाडगे यांनी केले आहे.

ऐपत नसतांना दाखविली माणूसकी
पैसे कंपनीत आहेत त्यामुळे आम्ही पैसे देऊ शकत नाही. कंपनीकडे आमचे पगार देखील बाकी आहेत व तुमच्यासारखे आम्ही देखील पैसे भरले आहेत, असे सांगून अनेकांनी आपले अंग झटकून घेतले व पॉलिसीधारकांना पैसे दिले नाहीत. मात्र या कंपनीचे एजंट असलेले शहरातील पवारवाडी येथील रहिवासी अतुल घाडगे या गोष्टीला अपवाद ठरले असून त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत चक्क त्यांनी ज्यांच्याकडून पॉलिसी घेतल्या होत्या. अशा पॉलिसीधारकांना आपल्या खिशातुन पैसे देण्याचे ठरवले.

शिवदास चव्हाण (रा.अनिल नगर) यांना 5 हजार रुपयांचा धनादेश नुकताच दिला आहे. व ज्यांची रक्कम त्यांच्यामार्फत जमा झाली असेल अशा देखील ते टप्प्याटप्प्याने पैसे देणार आहेत. तसेच ते स्वत: खासगी कंपनीत कामाला असून पाहिजे तशी कमाई त्यांना नाही तरी देखील त्यांनी माणुसकी दाखवून पैसे देणे सुरु केले आहे. माझ्यासारख्या इतर एजंटांनी माणुसकी दाखवून गोरगरीब लोकांचे जमा केलेले पैसे त्यांना परत द्यावेत असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. त्यांदी दाखविलेल्या माणुसकी व प्रामाणिकपणाबद्दल काही पॉलिसीधारकांना त्यांचे आभार मानले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आमिष दाखवून फसवणूक
मागील काळात अनेक कंपन्या स्थापन होऊन एजंटामार्फत जनतेला जादा पैशाचे (व्याज) आमीष दाखवून कमी वेळेत जादा रक्कम मिळेल असे सांगून पैसा जमा केला काही वर्षे सदर पैसा पॉलिसीधारकांना देवून त्यांचा विश्‍वास संपादन केला आणि सर्व सामान्य जनतेसह गरिबांनी देखील या भूलथापांना बळी पडून अशा कंपन्यांमध्ये पॉलिसी काढल्या मात्र कालांतराने काही कंपन्यांनी पळ काढून पोबारा केला. तसेच याबाबत पोलिस स्टेशनला देखील तक्रारी झाल्या पण त्यांचा काही फायदा झाला नाही. उलट ठेवीची रक्कम व पॉलिसीची रक्कम बुडीत निघाली अशाच पीएसीएल कंपनीची शाखा चाळीसगाव येथे सुरु झाली अनेक एजंटमार्फत या कंपनीने अनेक पॉलिसी नागरिकांकडून जमा केल्या सदर कंपनी जुनी असल्याने लोकांनी तात्काळ विश्‍वास ठेवून कष्टाचे पैसे या कंपनीत पॉलिसी म्हणून ठेवले यात अनेकांना त्यांची रक्कम देखील मिळाली. मात्र 2014 साली व्यवहार बंद होऊन पोन्झी स्किम अंतर्गत कंपनीचे काम सेबीतर्फे बंद करण्यात आले. त्यामुळे कंपनीने आपला गाशा गुंडाळला होतो.