चाळीसगाव येथे संगणकीकृत अभिलेख व ई-फेरफारसाठी चावडी वाचनाचे आयोजन

0

चाळीसगाव । महाराष्ट्र शासनाच्या ई-फेरफार कार्यक्रमाअंतर्गत 1 ऑगस्ट, 2017 पासून सर्व सातबारा उतारे तलाठ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापूर्वी खातेदारांना त्यांचा सातबारा पडताळणीसाठी व त्यात दुरुस्ती असल्यास आक्षेप नोंदविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील संगणकीकृत सातबाराचे चावडी वाचनासाठी 16 ते 21 मे 2017 दरम्यान 7 मंडळस्तरावरील 61 गावांमध्ये चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करणेबाबत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व खातेदारांनी आपल्या संबंधित सजेवर उपस्थित राहून चावडी वाचन कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी कळविले आहे.

नियोजनाचा दुसरा टप्पाही लवकरच लागणार
तालुक्यातील एकूण 136 गावांपैकी 61 गावांचे सातबारा संगणकीकरणाचे कामकाज 98 टक्क्यापेक्षा अधिक झाल्याने पहिल्या टप्प्यात (16 ते 21 मे 2017 ) या गावांमध्ये चावडी वाचनाचे नियोजन असून उर्वरित गावांचे संगणकीकरणाचे काम अंतीम टप्प्यात असून त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम दुसर्‍या टप्प्यात करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाचे नियोजनही लवकरच प्रसिध्द करुन तालुक्यातील संपुर्ण सातबारा संगणकीकरणाचे कामकाज महिन्याभरात पुर्ण करण्याचे नियोजन आहे.

चावडी वाचनाच्या नियोजित कार्यक्रमात 16 ते 18 मे 2017 या कालावधीत चाळीसगांव मंडळातील 3 गावे, शिरसगांव मंडळातील 6 गावे, बहाळ मंडळातील 10 गावे तर हातले मंडळातील 3 गावांचा समावेश करण्यात आला आहे. 16 ते 19 मे 2017 दरम्यान मेहुणबारे मंडळातील 13 गावे, 16 ते 21 मे 2017 दरम्यान तळेगांव मंडळातील 9 गावे तर 16 ते 22 मे 2017 या कालावधीत खडकी मंडळातील 17 गावे असे पहिल्या टप्प्यातील 61 गावांमध्ये चावडी वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नागरीकांकडून सहकार्याचे आवाहन
चाळीसगांव तालुक्यातील 136 गावांमधील एकूण सातबार्‍यांची संख्या ही 1 लाख 37 हजार 81 इतकी असून आजतागायत 1 लाख 17 हजार 146 इतक्या सातबार्‍यांचे संगणकीकरणाचे काम पुर्ण झाले असून त्याची टक्केवारी 85.5 टक्के इतकी आहे. एकूण 136 पैकी 61 गावांचे संगणकीकरणाचे कामकाज 98 टक्क्यापेक्षा अधिक पुर्ण झाल्याने पहिल्या टप्प्यात 61 गावांची निवड चावडी वाचनासाठी करण्यात आली आहे. संगणकीकरणाच्या कामाचा आवाका अधिक असल्याने सर्व नागरिकांनी स्वतःशी संबंधीत 7/12 वेबसाईटवरून डाऊनलोड करून अथवा तलाठी यांचेकडील अभिलेख पाहण्यासाठी चावडी वाचनात सहभाग घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे तहसिलदार कैलास देवरे यांनी कळविले आहे.