चाळीसगाव वनविभागाच्या जाळ्यात अडकला अखेर बिबट्या

चाळीसगाव :  चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंदखेडे शिवारात बिबट्याने धुमाकूळ घालत पाळीव प्राण्यांचा फडशा पाडल्याने शेतकर्‍यांमध्ये भीती पसरली आहे. गुरुवारी रात्री वनविभागाने प्रकाश वामन पाटील यांच्या शेतात पिंजरा लावल्यानंतर शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता बिबट्या पिंजर्‍यात अडकला.

बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात
जिल्हा वनसंरक्षण अधिकारी विवेक होशींग यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव वनविभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, वनपाल जी.एच.पिंजारी, आर.व्ही.मोरे, वनमजूर बाळू शितोळे, श्रीराम राजपूत, वनरक्षक एस.बी.चव्हाण, राहुल पाटील, के.बी.पवार, आर.एस.पवार, अश्विनी ठाकरे, संजय गायकवाड, आर.एस.शिंदे आदींनी लावलेल्या सापळ्यात बिबट्या अडकल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.