पाटणादेवी जंगलातील घटना : दोन आरोपी पसार
चाळीसगाव- तालुक्यातील पाटणादेवी जंगलात चंदनाची झाडे तोडण्यासाठी आलेल्या तिघा चोरट्यांपैकी एकास वन्यजीव वनविभागाचे एम.बी.पटवर्धन व पथकाने 14 रोजी अटक केली तर दोघे आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. आरोपींकडुन 17 हजार 500 रुपये किमतीचे साडेतीन किलो चंदनाचे तुकडे व चंदनाचे झाड तोडण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगलात वनपरीक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) एम.बी.पटवर्धन, वनपाल आर.बी.शेटे, डी.एस.जाधव, वनरक्षक एन.एस.देसले, अमृता भोई, वनमजुर मोरकर, विजय पाटील, नाना पवार, अशोक नलावडे, कैलास चव्हाण, मोहन जाधव, गोरख राठोड, अनिल धाधवड, अनिल शितोळे हे 14 जुलै रोजी रात्री गस्त घालत असतांना कंपार्टमेंट 303 जवळ केदारकुंडकडे जाणार्या रस्त्याजवळ 3 ईसम हातात काही-तरी हत्यार घेवून संशयास्पद जाताना दिसल्याने पटवर्धन व पथकाने त्यांचा पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला असता अंधाराचा फायदा घेवून दोन आरोपी पळुन गेले तर सुकराम महादु उघडे (अंबाला, ता.कन्नड, जि.औरंगाबाद) यास अटक करण्यात आली. त्याच्याजवळ 17 हजार 500 रुपये किमतीचे साडेतीन किलो चंदनाचे तुकडे तसेच झाडे तोडण्यासाठी लागणारे कुर्हाड, कुदळ, आरी, मोबाईल व ईतर साधने जप्त करण्यात आली आहे. आरोपीस चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.